राज्यातील ८ लाख लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी ५०० रुपयेच मिळणार

मुंबई- राज्यातील सुमारे आठ लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे केवळ ५०० रुपयांचा मासिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी या महिलांना १५०० रुपये मिळत होते. मात्र, या महिलांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच १००० रुपयांचा मासिक लाभ घेतल्यामुळे यामध्ये कपात करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याआधी या योजनेअंतर्गत ९ हप्त्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पूर्ण १,५०० रुपये न मिळता केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या नियमानुसार, एकाच लाभार्थ्याला विविध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची एकूण मासिक मर्यादा १,५०० रुपये इतकी आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनाचा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. याआधी या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत होते. या महिलांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी ६,००० रुपये मिळतात. त्याचबरोबर राज्य सरकारच्या २०२३ मध्ये सुरू झालेल्या नमो महासन्मान निधी योजनेतून देखील तीन टप्प्यांत ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच या महिलांना एकूण १२,००० रुपये वार्षिक शासकीय योजनांमधून आधीच मिळत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना उरलेले ६,००० रुपयेच मिळणार असून, त्याचा मासिक हप्ता ५०० रुपये इतका असेल.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेची बारकाईने छाननी सुरू केली आहे. योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची पुन्हा एकदा तपासणी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ११ लाख अर्ज अपात्र ठरवले गेले असून, पात्र महिलांची संख्या २.५२ कोटींवर आली आहे.