मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 259 ठिकाणी हे मॉक ड्रिल घेण्यात येणार असून, यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित कसे राहावे, आपत्तीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा या मॉक ड्रिलचा उद्देश आहे. भारताने 1971 साली पाकिस्तान विरुद्धच्या युद्धानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असे मॉक ड्रिल होत आहे. राज्यात मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, मनमाड, सिन्नर, रोहा-नागोठणे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील शहरे तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहेत. मुंबई, उरण आणि तारापूर संवेदनशील असल्यामुळे प्रथम श्रेणीत समाविष्ट आहेत. दुसऱ्या श्रेणीत ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर यांचा समावेश आहे, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि भुसावळ हे तिसऱ्या श्रेणीत आहेत. मॉक ड्रिल तीन सत्रांमध्ये पार पडणार असून, यात सायरन तपासणी, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, बचावकार्याचे प्रात्यक्षिक या गोष्टींचा समावेश असेल. सरकारी इमारती, पोलीस मुख्यालये, फायर स्टेशन, सैन्य ठिकाणे, बाजारपेठा यांसारख्या ठिकाणी हे मॉक ड्रिल होतील. काही ठिकाणी वीज खंडित होणे, सायरनचा मोठा आवाज, वाहतूक वळवणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी अशा घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागरी सुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मॉक ड्रिलच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मॉक ड्रिलमध्ये सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड्स, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्राचे सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. नागरिकांनी या दरम्यान घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, 1968 यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित सराव आहे. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत? हे यातून दिसणार आहे. दरम्यान, मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सलग सुट्ट्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने सध्या कडक बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण भारतात 259 ठिकाणी तीन श्रेणींमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी 13 शहरे, दुसऱ्या श्रेणीत 201 शहरे आणि तिसऱ्या श्रेणीत 45 शहरे समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरक्षण विषयक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्य सचिव तसेच नागरी सुरक्षा प्रमुख सहभागी झाले होते. बैठकीत मॉक ड्रिलसाठी ठरवण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (एसओपी) आणि मार्गदर्शक सूचनांवर सविस्तर
चर्चा झाली.









