मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे चर्चेचे वादळ निर्माण केलेले असताना प्रत्यक्षात मात्र वेगळ्या हालचाली सुरू आहेत. राज-उद्धव नव्हे तर राज ठाकरे यांची मनसे व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत आपसात जागा वाटप करून एकत्र लढवणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार पुढच्या चार महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र, सर्व पक्षांचा डोळा देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर आहे.
भाजपाने कोणत्याही परिस्थितीत यावेळी महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. तर, उध्दव ठाकरेंची शिवसेना मुंबई पुन्हा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून चाचपणी सुरू केली होती.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळे वाद विसरायला तयार आहोत असे विधान एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. त्यामुळे ठाकरे समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पडद्यामागे वेगळेच काही शिजत आहे. मनसे व शिंदे सेना महापालिका एकत्र लढवणार असल्याचे समजते. दोघांत जागा वाटप होईल. मनसे हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र येऊन लढल्यास भाजपाची भूमिका नेमकी काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मनसेने महायुतीत सहभागी होऊन शिंदे सेनेच्या कोट्यातून जागा घ्यावी की, भाजपाला वगळून शिंदे व राज ठाकरे यांनी एकत्र लढावे याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याचा भाजपाचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. 2017 च्या निवडणुकीत भाजपाने एकहाती लढून जवळपास शिवसेनेइतक्याच जागा पटकावल्या होत्या. मात्र, त्यावेळी झालेल्या तडजोडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद देण्यात आले. आता शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. तर, भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. सर्व प्रकारची साधने हाती असल्याने शिंदेंची शिवसेना व मनसेसोबत लढण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याचाच भाजपाचा प्रयत्न असेल, असे बोलले जात आहे.
मनसे व शिंदेंची शिवसेना एकत्र आल्यास ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. पक्षातील उभी फूट आणि विधानसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत त्यांचे मुंबईतील जवळपास अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदे गटात किंवा भाजपामध्ये गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद बरीच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांच्या दिमतीला राज ठाकरे यांच्या रूपाने ‘ठाकरे’ असल्यास शिवसैनिकांमध्ये फूट पडेल. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. या संभाव्य राजकीय चालींना उद्धव ठाकरे कसे उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भाजपाचे मिशन 150
तर शिंदेंचे मिशन 100
शिंदे सेना आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच महायुतीत भाजपा आणि शिंदे यांच्याकडून मुंबई महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला येतील, असा प्रयत्न सुरू आहे. भाजपाने मिशन 150 ची घोषणा केली आहे, तर शिंदे यांनी 100 जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. शिंदे सेनेने ठाकरे गटाचे 48 माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. भाजपाने मागील महापालिकेत शिवसेनेखालोखाल सगळ्यात जास्त नगरसेवक भाजपाचेच होते. त्यामुळे भाजपा 150 हून कमी जागा मान्य करण्याची शक्यता नाही. तर ठाकरेंचे नगरसेवक आपल्याकडे खेचलेल्या शिंदे सेनेला या सगळ्या नगरसेवकांना निवडणुकीत उतरवायचे तर जास्त जागा लढवाव्या लागणार हे उघड आहे. त्यामुळे भाजपा आणि शिंदे सेनेत पालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
