वॉशिंग्टन- भारतात नागरिकांना एका राज्यातून इतर राज्यात जाण्यास निर्बंध नाही. मात्र ते जिथे जातील तेथील कायदे पाळणे व राहताना पाणी, रस्ते आदींचा कर भरणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही आणि मग या परप्रांतीयांच्या लोंढ्याचा बोजा होतो. मुंबईत परराज्यातून येणार्या लोंढ्यांमुळे मराठी माणसावर अन्याय होत असल्याचे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उठवतात तेव्हा हे राजकारण आहे किंवा हा संकुचित विचार आहे अशी त्यांच्यावर टीका होते. मात्र आता अमेरिकेत येणार्या परदेशी नागरिकांच्या बाबतीत एलन मस्क यांनी हीच भूमिका घेतली आहे. भारताकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज ठाकरे यांच्यावर परप्रांतीय मुद्यावरून अनेकदा देशभरातून टीकाही होत असते. आता त्यांच्यासारखीच भूमिका उद्योगपती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी एलन मस्क यांनी घेतली आहे. मस्क यांनी एक्स पोस्ट करून जगभरातील एका भागातून दुसर्या भागात मोठ्या प्रमाणात होणार्या स्थलांतराला विरोध केला आहे. या प्रकारचे स्थलांतर देशाची ओळख पुसून टाकते, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
एलन मस्क यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये स्थलांतराला विरोध करत म्हटले की, सामूहिक स्थलांतर ही मोठी विचित्र गोष्ट आहे. जो देश सामूहिक स्थलांतराला परवानगी देईल, त्याचा नाश होईल. त्याचे अस्तित्वच पुसले जाईल. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. जगात 8 अब्ज लोक असतील आणि तुम्ही 5-6 कोटी लोकसंख्येचा देश असाल किंवा मध्यम आकाराचा देश म्हणजे अमेरिकेसारखा 35 कोटींचा देश असाल तर उर्वरित जगातील फक्त काही टक्के लोक देशात येऊन त्याची ओळख नष्ट करू शकतात. देश म्हणजे नुसता भूगोल नसतो तर त्यातील माणसे म्हणजे देश असतो. ही अगदी मूलभूत आणि स्वाभाविक संकल्पना आहे. उदाहरणार्थ तुम्ही इटलीतील काही लोकांना अमेरिकेतील कुठल्या भागात नेलेत, तर इटली इटलीच राहील. परंतु जगातील इतर कुठल्या भागातले लोक इटलीत आले
तर इटाली हा देश इटली राहाणार नाही, तर दुसरा देश बनेल. कारण त्या देशातील नागरिकांच्यामुळे बनलेली विशेष ओळख आणि त्यांचा आत्माच नष्ट होईल. म्हणूनच मी म्हणतो की देश म्हणजे भूगोल नाही, तर त्यातील माणसे म्हणजे देश असतो.
डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आपल्या देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांची त्यांनी हकालपट्टीही केली. त्यात भारतीयांचाही समावेश होता. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हातापायात बेड्या ठोकून अमेरिकन विमानाने भारतात परत पाठवल्यानंतर भारतीयांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. परदेशी विद्यार्थ्यांवरही नवी बंधने घातली आहेत. याशिवाय बाहेरच्या देशातून स्थलांतरितांनी अमेरिकेत येऊ नये, यासाठी त्यांना विमानतळावरूनच परत पाठवले जात आहे. स्थलांतिरतांच्या विरोधात नवा कायदाही केला जाणार आहे. ट्रम्प यांच्या या स्थलांतरितविरोधी धोरणाची जगभरातील देशांना धास्ती वाटत असतानाच असतानाच आता त्यांचे जवळचे सहकारी एलन मस्क यांनीही तसाच सूर लावला आहे. राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर जी समस्या मांडली आहे, तीच मस्क यांनी वैश्विक पातळीवर मांडली आहे. स्थलांतरांचे ओझे इतरांना वाहावे लागते हे अन्यायकारक आहे असे दोघांचेही म्हणणे आहे. त्यामुळेच मस्क यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही जणांनी त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमती दर्शवली आहे. तर काहींनी स्थलांतर धोरणांवरील त्यांच्या विधानांच्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका नेटिझनने म्हटले आहे की, मस्क स्वतः स्थलांतरित आहेत. त्यांच्या आईचा जन्म कॅनडात झाला आहे. नंतर ती दक्षिण आफ्रिकेत गेली. तर त्यांची आजी दुसर्या महायुध्दाच्यावेळी इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला गेली होती. त्यांचे आजोबा इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला, तर पणजोबा श्रीलंकेहून दक्षिण आफ्रिकेला गेले आहेत. मस्क स्वतः दक्षिण आफ्रिकेहून कॅनडाला आणि नंतर अमेरिकेला आले आहेत. ते 2002 मध्ये अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. आता तेच स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. स्थलांतरित वाईट नसतात. अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांनी स्थलांतरितांमुळेच प्रगती केली आहे, अशीही प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे. तर काही जणांनी मस्क यांना समर्थन दिले असून याबाबतीत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.