राणाला हवाई दलाच्या विमानाने भारतात आणलेपालम विमानतळाला पोहोचण्यास 9 तास विलंब


नवी दिल्ली – मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेहून भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आले. दिल्लीच्या हवाई दलाच्या पालम विमानतळावर संध्याकाळच्या सुमारास हे विमान उतरले, तेव्हा विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था होती. तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान 9 तास उशिरा पोहोचले. विमानतळावरून राणाला एनआयएने अधिकृतरित्या अटक केली. विमानतळावरच त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर त्याला विशेष एनआयए न्यायालयात हजर केले. त्याच्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर लगेच दुसर्‍याच दिवशी म्हणजे सोमवार 7 एप्रिल रोजीच एनआयएचे उपमहानिरीक्षक जया रॉय यांच्या नेतृत्वाखालील सहा अधिकार्‍यांचे पथक त्याला भारतात आणण्यासाठी अमेरिकेत पोहोचले होते. 8 एप्रिलच्या संध्याकाळी जया रॉय यांनी लॉस एंजेलिसमध्ये राणाला ताब्यात घेण्यासाठी ‘सरेंडर वॉरंट’वर स्वाक्षरी केली होती. यानंतर भारतीय पथक भारतीय वायुदलाच्या खास विमानाने राणाला घेऊन भारताकडे रवाना झाले. हे विमान काल रात्री किंवा आज सकाळी वायुदलाच्या दिल्लीतील पालम विमानतळावर पोहोचण्याची शक्यता होती. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे आगमन लांबले. राणाला पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या मुख्यालयात नेले जाणार आहे. तिथे त्याची मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. एनआयएच्या ताब्यात आल्यानंतर राणाची चौकशी करण्याची जबाबदारी एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 26/11च्या हल्ल्यावेळी मुंबईत पोलीस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांनी दहशतवाद्यांचा मुकाबलाही
केला होता.
तहव्वूर राणा याला अमेरिकेतून आणले जाणार असल्याने पालम विमानतळावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार इनोव्हा, दोन सफारी, जॅमर, बॉम्ब विरोधी पथक या विमानतळावर तैनात होते. एनआयए मुख्यालयातील इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये राणाची चौकशी केली जाणार आहे. हा सेल तिसर्‍या मजल्यावर तयार करण्यात आला आहे. या सेलमध्ये केवळ 12 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. या सेलमध्ये ज्यांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामध्ये एनआयएचे सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्याप्रमाणे तहव्वूर राणा याला मात्र आरोप सिद्ध झाले तरी फाशीपर्यंत नेता येणार नाही. याचे कारण म्हणजे भारताला या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण कराराचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार राणा या खटल्यात दोषी ठरला तरी त्याला फाशीची शिक्षा ठोठावता येणार नाही. तसेच त्याच्याविरोधात नवा खटलाही दाखल करता येणार नाही. भारतीय तपास यंत्रणांनी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावेळी अमेरिकेच्या न्यायालयात जे खटले लिहून दिले आहेत, तेच खटले आता राणा याच्याविरोधात चालवता
येणार आहेत.
दरम्यान, राणा मूळचा पाकिस्तानी असला तरी पाकिस्तानने राणाशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, तहव्वूर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो आता कॅनेडियन
नागरिक आहे.
दरम्यान, काँग्रेसने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे श्रेय मोदी सरकारचे नाही, तर आपले आहे, असा दावा केला आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी असे म्हटले आहे की, यूपीए सरकारच्या काळात जी पूर्वतयारी करण्यात आली, त्यामुळेच आज तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण शक्य होत आहे.