पुणे -स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घेण्याचा अर्ज पुणे न्यायालयाने मंजूर केला आहे. आमदार-खासदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला.
न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात आरोपी तथ्य आणि कायद्याशी संबंधीत असे मुद्दे उपस्थित करत आहेत जे गुंतागुंतीचे आहेत. आरोपीने काही मुद्दे मांडले आहेत, ज्यांचा निर्णय ऐतिहासिक तथ्यांच्या आधारेच होणे शक्य आहे. त्यामुळे माझ्या मते, या प्रकरणाला समरी पद्धतीने चालवणे योग्य नाही, कारण अशा खटल्यात सविस्तर पुरावे मांडले जात नाहीत, सखोल चौकशी होत नाही. याऊलट समन्स प्रकरणात आरोपीला सविस्तर पुरावे सादर करता येतात आणि तक्रारदाराच्या साक्षीचे सखोल विश्लेषण करता येते. न्यायाच्या हितासाठी हे प्रकरण समन्स खटल्याप्रमाणे चालवणे आवश्यक आहे. सध्याचे प्रकरण समन्स खटल्याप्रमाणे चालवले गेले, तर कोणत्याही पक्षाला नुकसान होणार नाही. या खटल्याची पुढील सुनावणी शुक्रवारी २५ एप्रिलला होणार आहे.