मुंबई – मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे सोलापूरच्या चंद्रकांत धोत्रे(६०) या व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एका कार्यकर्त्याचे वडील होते. ते कामानिमित्त सोलापूरहून मुंबईला आले होते.
काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास खोली क्र. ४०८ मध्ये थांबलेले चंद्रकांत धोत्रे यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यासाठी १०८ क्रमांकावर फोन केले. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना तातडीने पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णवाहिका वेळेत आली नाही, त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप धोत्रे यांच्या नातेवाईकांनी केला.
