पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अमानवी वर्तनाने गर्भवती तनिषा भिसे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धारणेतून महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयाला या मृत्यूस जबाबदार धरताना मंगेशकर कुटुंबावरही टीका होऊ लागली आहे. समाजमाध्यमावर याविषयी मनोगते लिहिली जात आहेत. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल आणि आज मंगेशकर कुटुंबाच्या सार्वजनिक हिताच्या कार्याबाबत सवाल उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिले. तरीही वडेट्टीवार आपल्या टीकेवर ठाम आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुग्णालयावर कडक कारवाई केली पाहिजे. मंगेशकर कुटुंब गायक आहेत. पण त्यांनी काही योगदान दिलेले नाही. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे त्यांना विशेष वागणूक देण्याचे कारण नाही. विजय वडेट्टीवार यांनी आपली ही भूमिका प्रत्यक्षात अत्यंत कडव्या शब्दांत व्यक्त केली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता मंगेशकर कुटुंबाला ओळखते. त्यांचे योगदान जगाला आणि भारताला माहीत आहे.
त्यामुळे त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करू नये, असे मला वाटते. परंतु अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतरही विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा मंगेशकर कुटुंबावर जहरी टीका केली. दरम्यान पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर्तनामुळे मृत्यू झालेल्या गर्भवती तनिषा भिसे यांच्या कुटुंबाने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.
भिसे कुटुंब म्हणाले की, या प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांना तत्काळ बडतर्फ करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करा. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आमच्या कुटुंबाची आणि तनिषा भिसे यांची वैयक्तिक माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवणारे व अंतर्गत अहवाल सार्वजनिक करणारे डॉ. धनंजय केळकर, डॉ. अनुजा जोशी, डॉ. समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे व डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर पोलीस व महिला आयोगाने तत्काळ कठोर कारवाई करावी. ससून रुग्णालय समितीने पोलीस विभागाला या प्रकरणाचा अहवाल लवकर द्यावा. यामुळे संबंधित व्यक्ती देश सोडून पळून जाण्यापूर्वी त्यांना अटक करता येईल. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्या त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की सरकारने सर्वच रुग्णालयांमध्ये एक सेवा प्रणाली तयार करून त्याअंतर्गत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक योजनांबद्दलची माहिती देण्यास सहकार्य करावे. हीच तनिषा यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनास सादर केल्याची पान 1 वरून- माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक्सच्या माध्यमातून दिली. त्यांनी एक्सवर लिहिले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी अहवाल 8 एप्रिलला विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून, विभागाने अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर केला आहे. या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.
