Home / News / लंडन मधील हिथ्रो विमानतळावर सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांचा संप

लंडन मधील हिथ्रो विमानतळावर सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांचा संप

लंडन – लंडनमधील हिथ्रो या जगातील सर्वात मोठ्या विमानतळावरील सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून चार दिवसांचा संप पुकारला आहे. रोस्टर पद्धतीवरील नाराजीमुळे हा संप पुकारण्यात आला आहे.हिथ्रो हा जगातील एक महत्त्वपूर्ण व मोठा विमानतळ आहे. या ठिकाणी जगातील विविध भागातून विमानांची येजा सुरु असते. या विमानतळावरील सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून पुढील चार दिवसासाठी संप पुकारला आहे. कामाच्या वेळा व दिवस ठरवण्यासाठी असलेली रोस्टर प्रणाली ही जाचक असल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. या आधी एप्रिल महिन्यातही याच मागणीसाठी संप पुकारला होता. हिथ्रो विमातळावरील २ ते ५ या टर्मिनलवरील प्रवासी व व्यापारी सेवेमधील ६५० अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत चार दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ४ सप्टेंबर पासून पुढील १८ दिवसांसाठी संप केला जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, दीर्घकालीन कामाच्या तासांमुळे अनेकांवर दडपण येत आहे. आमचे सदस्य फार वाईट परिस्थितीत काम करत आहेत. कामाच्या या वेळांमुळे मुलांना शाळेत नेणे व आणणेही शक्य होत नाही. कामाच्या वेळेमध्ये लवचिकता आणली तर त्याचा फायदा कार्यक्षमतेवरही होईल. इंग्लडच्या गृह विभागाने या बाबत म्हटले आहे की, आमची कामगार संघटनांबरोबर चर्चा सुरु असून लवकरच यावर तोडगा निघू शकेल.