Home / News / विनेशने रक्त काढले! केस कापले! नखे काढली पॅरीस – पण 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र केले

विनेशने रक्त काढले! केस कापले! नखे काढली पॅरीस – पण 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र केले

पॅरिस ऑलिम्पिकच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट छोट्याशा चुकीमुळे अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी विनेशने रक्त काढून घेतले, केस कापले, नखेही कापली. पण तरीही तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले. विनेशसह तमाम भारतीयांसाठी हा जबरदस्त धक्का ठरला. अंतिम सामन्याला मुकल्याने विनेशचे सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळविण्याचे स्वप्न भंग पावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची तातडीने दखल घेत विनेशच्या अपात्रतेबद्दल सर्व माहिती घेतली. संसदेतही विनेशच्या अपात्रतेवरून विरोधकांनी गदारोळ केला. दुपारी 3 वाजता क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत याबाबत निवेदन केले.
विनेशला अपात्र ठरविण्याच्या ऑलिम्पिक समितीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष माजी धावपटू पी टी उषा यांच्याशी फोनवरून थेट संपर्क साधून अपात्रतेच्या नियमांबद्दल माहिती घेतली. त्यानंतर मोदींनी एक्स सोशल मीडियावर ’विनेश तू भारताचा गौरव आहेस. तू देशाची चॅम्पियन आहेस’, अशा शब्दात कौतुक करून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
जपानच्या सुसाकीवर मात करून उपान्त्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर विनेशचे वजन करण्यात आले. तेव्हा ते 52 किलो भरले . त्यामुळे विनेशने वजन कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले.आजच्या अंतिम सामन्याच्या आदल्या रात्री तिने जराही झोपली नाही. तिने सायकल चालवली, दोरीउड्या मारल्या. एवढेच नव्हे, तर आपले केस आणि नखेदेखील कापली. आज सकाळी नऊ वाजता तिचे वजन करण्यात आले. तेव्हा ते 50 किलो 200 ग्रॅम एवढे भरले.त्यानंतर तिला वजन कमी करण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला.या अवधीत तिला केवळ 100 ग्रॅम वजन कमी करता आले.सव्वा नऊ वाजता पुन्हा एकदा वजन केले तेव्हा ते 50 किलो 100 ग्रॅम इतकेच भरले.त्यामुळे नियमानुसार तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले.
या स्पर्धेत विनेशने उपांत्यपूर्व फेरीत क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला.उपांत्य फेरीत विनेशने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेली ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जपानची युई सुसाकी हिचा 3-2 असा पराभव केला.सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती राहिली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सुसाकीने तिचे सर्व 82 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. मात्र विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला धूळ चारली.आज रात्री 11 वाजता अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी विनेशचा सामना अमेरिकेच्या साराह न हिल्डरब्रँड हिच्याशी होणार होता.
दरम्यान, आपण अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्याचे समजताच विनेश कमालीची निराशा झाली. त्यातच तिला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. भोवळ आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.