Home / News / शहांच्या वक्तव्यावर विचार करावा! केजरीवालांचे नायडू-नितीश यांना पत्र

शहांच्या वक्तव्यावर विचार करावा! केजरीवालांचे नायडू-नितीश यांना पत्र

नवी दिल्ली – गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबांबू नायडू यांना पत्र पाठवले. अमित शहा यांच्या वक्तव्यावर तुम्ही विचार करावा,असे केजरीवाल यांनी या पत्रात म्हटले आहे .
अरविंद केजरीवाल यांनी या पत्रात म्हटले की, आपला संबंध केवळ संविधानाशीच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेशीही आहे. नुकतेच संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊन केलेल्या वक्तव्याने संपूर्ण देश हादरला आहे.

आजकाल आंबेडकर-आंबेडकर बोलण्याची फॅशन झाली आहे,असे त्यांचे विधान केवळ अपमानास्पदच नाही तर बाबासाहेब आणि आपल्या राज्यघटनेबद्दलच्या भाजपाच्या विचारसरणीचा पर्दाफाश करणारे आहे. बाबासाहेबांबद्दल असे बोलण्याची भाजपाची हिंमत कशी झाली. देशभरातील कोट्यवधी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. हे वक्तव्य केल्यानंतर अमित शहा यांनी माफी मागण्याऐवजी आपले वक्तव्य योग्य ठरवले.अमित शहा यांच्या वक्तव्याचे पंतप्रधानांनी जाहीर समर्थन केले.बाबासाहेब हे फक्त नेते नाहीत, तर ते आपल्या देशाचा आत्मा आहे.भाजपाच्या या वक्तव्यानंतर तुम्ही या मुद्द्यावर खोलवर विचार करावा,अशी जनतेची इच्छा आहे.