शिंदे गटात गेलेल्या शिंगाडेंची पाच महिन्यात घरवापसी

मुंबई – शिंदे गटाकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. शिंदे गटात गेलेल्या माजी विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. अंधेरी (पूर्व) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनीही अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
सुजाता शिंगाडे म्हणाल्या की, मी ३० जानेवारी रोजी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता जवळपास ५ महिने झाले. ती माझी फार मोठी चूक होती. मी आज दिलगिरी व्यक्त करते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी आहे. ज्या लोकांना पैसे देऊन घेतले त्या लोकांनाही आता पश्चात्ताप होत आहे. मला शिंदे गटाने काही बैठका घ्यायला लावल्या होत्या. मी बैठका घेतल्या. पण तिथे कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. मला त्यांनी कोणतेही आमिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिंधी नाही.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असेल. सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळली, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटले होते. पण आज तुम्ही परतण्याचा निर्णय घेतला तो निर्णय घेण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते.