Home / News / संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जेजुरीत मुक्काम

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जेजुरीत मुक्काम

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज जेजुरीला मुक्काम केला. त्यामुळे या पालखीचे जेजुरीतील लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण जेजुरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमून गेली. ही पालखी उद्या सकाळी जेजुरीहून निघाल्यानंतर वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे.यवत पालखी तळावरुन आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली. या पालखीने केडगाव चौफुला मार्गे प्रवास करत वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम केला. उद्या सकाळी ही पालखी पाटस मार्गे, उंडवडी गवळ्याची येथील पालखी तळावर मुक्काम करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी सकाळी संत सोपानदेवांच्या सासवड येथून खंडेरायाच्या जेजुरीकडे मार्गक्रमण करत होती. त्यावेळी वाळुंज फाटा येथे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतला. वारकऱ्यांनी सिलिंडरवर वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखी सोहळ्यामध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन जवानांनी सिलिंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला.