सलमान खानला पुन्हाजीवे मारण्याची धमकी

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबईतील वरळी येथील परिवहन विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावरून पाठवण्यात आली असून, त्यात सलमानची गाडी बॉम्बने उडवून देऊ आणि त्याच्या घरात घुसून त्याला ठार मारू असे म्हटले आहे. . याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

या धमकीमुळे सलमान खानच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाच महिन्यांपूर्वीही मुंबई वाहतूक पोलिसांना एक धमकीचा संदेश प्राप्त झाला होता, ज्यात दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास सलमानचा जीव घेतला जाईल, असे म्हटले होते. त्याआधी १४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स ग्रुपने स्वीकारली होती.