‘सहारा समूहावर’ मोठी कारवाई! ईडीकडून ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ तील तब्बल ७०७ एकर जागा जप्त

नवी दिल्ली- ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने सहारा समुहाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली सिटीमधील ७०७ एकर जमीन जप्त केली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत १,४६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सहारा ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून मिळालेल्या पैशातून ही उच्च किमतीची जमीन खरेदी करण्यात आली होती आणि खरी मालकी लपविण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, अशी पुष्टी ईडीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी केली. “सहारा ग्रुपच्या कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांचा वापर करून बेनामी नावांनी ही जमीन खरेदी करण्यात आली होती,” असे अधिकाऱ्याने सांगितले. टी त्याचप्रमाणे पीएमएलएच्या कलम १७ अंतर्गत केलेल्या छाप्यादरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी २.९८ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. हमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याबद्दल ओरिसा, बिहार आणि राजस्थानमध्ये तीन एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून सहाराशी संबंधित अनेक कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध देशभरात ५०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, त्यापैकी ३०० हून अधिक पीएमएलएमध्ये सूचीबद्ध गंभीर गुन्ह्यांमध्ये येतात.