Home / News / सायन पुलावरील बंदीमुळे बेस्टचे २३ बसमार्ग बदलले

सायन पुलावरील बंदीमुळे बेस्टचे २३ बसमार्ग बदलले

मुंबई- ११० वर्षे जुना असलेला मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील उड्डाणपूल पाडून पुन्हा नव्याने बांधला जाणार आहे. या कामासाठी या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे बेस्ट प्रशासनाने बसेसच्या २३ मार्गात बदल केले आहेत. या पुलाचे काम पुढील १८ महिने चालणार आहे.

या पुलावर अवजड वाहनांना बंदी घातल्याने चेंबूरमार्गे येणार्‍या बसेस बीकेसी आणि दक्षिण मुंबईतून येणार्‍या बसेस सायन रुग्णालयाच्या अगोदर असलेल्या सिग्नलवरून डावीकडे वळसा घेणार आहेत.त्यामधील ११ मर्यादित ही बस वांद्रे वसाहत, कला नगर मार्गे टी जंक्शन येथून सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालयमार्गे नेव्ही नगर येथे जाईल.बस क्रमांक १८१, २५५ म .३४८ म. ३५५ म या बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालय, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे जातील आणि बस क्र ए ३७६ ही राणी लक्ष्मीबाई चौकहून लोकमान्य टिळक रुग्णालय सुलोचना सेठी मार्गाने बनवारी कॅम्प, रहेजा मार्गे माहीम येथे जाईल.