Home / News / सोहळा आरसीबीने आयोजित केला! तेच दुर्घटनेला जबाबदार! गुन्हा दाखल

सोहळा आरसीबीने आयोजित केला! तेच दुर्घटनेला जबाबदार! गुन्हा दाखल

बंगळुरू- बंगळुरूच्या आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजयोत्सव सोहळ्यावेळी बाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA


बंगळुरू- बंगळुरूच्या आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजयोत्सव सोहळ्यावेळी बाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची न्यायालयीन चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचा आदेश कर्नाटक सरकारने दिलेला असताना अचानक न्यायालयाने स्वतःहून (स्यु मोटो) या घटनेची दखल घेतली आणि आजच दुपारी यावर सुनावणीही घेतली. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या हालचाली झाल्या का, अशी चर्चा सुरू झाली. न्यायालयात मात्र कर्नाटक सरकारने स्पष्ट केले की, स्टेडियमवरील सोहळा हा आरसीबीने आयोजित केला होता. तिकीटेही त्यांनीच वाटली. त्यामुळे या घटनेत कर्नाटक सरकारचा काहीच दोष नाही. यानंतर दुपारी आरसीबीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाने आता कर्नाटक सरकारकडे या प्रकरणी मंगळवारपर्यंत स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्या. व्ही. कामेश्वर राव आणि न्या. सी.एम.जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली. राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता शशी किरण शेट्टी यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, वेगवेगळ्या प्रसार माध्यमांत या दुर्घटनेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावरून आम्ही या घटनेची गंभीर दखल घेत आहोत. या प्रकरणात एकाने खासगी याचिका केली आहे. त्याचे वकील अरुणा श्याम यांनी सवाल केला की, हा कार्यक्रम कुणी आयोजित केला होता? कर्नाटक सरकारने की कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने? याचे उत्तर जनतेला हवे आहे. देशासाठी किंवा राज्यासाठी न खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार करणे राज्याचे कर्तव्य आहे काय? त्यांनी विधानभवन आणि चिन्नास्वामी स्टेडियम या दोन ठिकाणी हा कार्यक्रम का आयोजित केला? राज्याने कोणत्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या? राज्याने रुग्णवाहिका कुठे तैनात केल्या हे स्पष्ट करावे.
ॲडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी यांनी याला उत्तर देताना सांगितले की, राज्य सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. तो आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केला होता. हा संघ बंगळुरुचा असल्याने या विजयोत्सवात आपणही सहभागी व्हावे, असे कर्नाटक सरकारला वाटले. म्हणून संघाला विधानभवनात बोलावून त्यांचा सत्कार केला . या कार्यक्रमावेळी काहीही अघटित घडले नाही. नंतर स्टेडियमवर जो विजयोत्सव आयोजित केला होता तो आरसीबीचा होता.
कर्नाटक सरकारच्या वतीने न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, चिन्नास्वामी स्टेडियमभोवती शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्युक उपायुक्तांसह 1,000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आणि कमांड अँड कंट्रोल वाहनेदेखील उपस्थित होती. मागील सामन्यांदरम्यान केलेल्या व्यवस्थांपेक्षा ही व्यवस्था जास्त होती. स्टेडियमची क्षमता 35,000 आहे. साधारणपणे फक्त 30,000 तिकिटे विकली जातात. मात्र यावेळी सुमारे अडीच लाख लोक प्रवेश मोफत आहे असे समजून आले.आम्ही विनंती करू इच्छितो की कोणताही आरोप-प्रत्यारोप होऊ नये. आम्हाला फक्त वस्तुस्थिती जशी घडली तशीच सांगायची आहे. आम्ही कोणताही विरोधी दृष्टिकोन मांडत नाही आहोत. आम्ही सर्व गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू. या प्रकरणाची सरकारने न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशीचा निर्णय घेतला असून तिचा अहवाल पंधरा दिवसांत मागितला आहे.
सरकारच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने असे नमूद केले की, चेंगराचेंगरी किंवा अशा घटनांची शक्यता कमी करण्यासाठी सरकारने एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) अवलंबणे महत्त्वाचे आहे. यानंतर खंडपीठाने राज्य सरकारकडून या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट मागितला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी ठेवली आहे.
आयपीएल अध्यक्ष अरुण धुमल आज या घटनेबाबत म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या कार्यक्रमाची कोणतीही माहिती नव्हती. आम्ही संपूर्ण उत्सव अहमदाबाद स्टेडियममध्ये आयोजित केला होता. आमची जबाबदारी तिथे संपली. नंतर हे आयोजन कुणी केले माहीत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः तेथे उपस्थित होते. मग पोलीस काय करत होते? या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. मला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. ही एक दुःखद घटना आहे.
या दुर्घटनेनंतर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मी त्यांची तुलना करत नाही. बंगळुरूत घडलेल्या घटनेचे समर्थनही करणार नाही. परंतु कुंभमेळ्यात 50 ते 60 लोकांचा मृत्यू झाला होता. मी टीका केली नाही. काँग्रेस टीका करत असेल तर ती वेगळी बाब आहे. त्या घटनेवर मी किंवा कर्नाटक सरकारने टीका केली होती का? मला या घटनेचा बचाव करायचा नाही किंवा सरकार या घटनेचे राजकारणही करणार नाही. मी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. लोकांनी स्टेडियमचे दरवाजेही तोडले आणि चेंगराचेंगरी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी येण्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमचा सोहळा हा आरसीबीने आयोजित केला होता. संघांतील परदेशी खेळाडूंना परतायचे होते म्हणून घाईने हा सोहळा आयोजित केला. यावेळी सुरक्षेची खबरदारी घेतली नाही. त्यांनी सोहळ्याची तिकिटे ऑनलाईन विकायला सुरूवात केली, पण खरेदीसाठी झुंबड उडाल्याने त्यांनी ऑनलाईन तिकिट विक्री बंद करून मोफत प्रवेश दिला जाईल असे सांगितले. यामुळे लाखो चाहते आले. आरसीबीला याची जाणीव व्हायला पाहिजे होती , पण त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. यामुळे आरसीबी वर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आरसीबी संघाचे मालक युनायटेड स्पिरिट लि. वर गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे. आपली गंभीर चूक उघड झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरसीबीने आज मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये मदत जाहीर केली. जखमी रुग्णांची काळजी घेण्यासाठी आरसीबी केअर केंद्र सुरू केल्याचे जाहीर केले. तरीही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असाच सूर आहे.माझ्या मुलाचे तुकडे करू नका!
या दुर्घटनेत मत्यू झालेल्या सर्व 11 जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते त्यांच्या कुटुंबांकडे आज सोपवले. मृतांमध्ये भूमिक (18), सहाना (21), पूर्णचंद्र (25),चिन्मयी (19), दिव्यांशी (14), श्रवण कुमार (26), कामाक्षी देवी (29), शिवलिंग (17),मनोज कुमार (18), प्रज्ज्वल (22), अक्षता पै (26) यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या एका तरुणाचे शोकाकूल वडील टाहो फोडून म्हणत होते की, माझा एकुलता एक मुलगा मी गमावला आहे. तो मला न सांगता चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव पाहायला गेला होता. चेंगराचेंगरीत त्याचा मृत्यू झाला. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन भेट देऊ शकतात. पण त्याला कोणीही परत आणू शकत नाही. आता निदान शवविच्छेदन करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका. मला किमान त्याचा मृतदेह द्या.
कोलार येथील 21 वर्षीय सहानाचाही या घटनेत मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाला तिचा मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. चिंतामणी येथील रहिवासी प्रज्ज्वल एका खासगी कंपनीत नोकरीला होता. दुसऱ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगून तो घराबाहेर पडला होता. मृतांच्या यादीत त्याचे नाव आल्यानंतर कुटुंबाला त्याच्या मृत्यूबद्दल समजले. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या मयत मनोजकुमारचे वडील देवराज म्हणाले की, त्यांचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. मुलाने चांगले शिक्षण घ्यावे म्हणून त्याला कधी पाणीपुरीच्या प्लेट साफ करू दिल्या नाहीत. तर मयत प्रज्ज्वलच्या आईने सांगितले की, तो आरसीबीचा चाहता होता. आरसीबीच्याच जर्सीमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या विजयानंतर तो वेड्यासारखा नाचला होता. आता आरसीबी त्याला परत आणणार आहे का? 14 वर्षीय दिव्यांशी ही तिची आई आणि धाकट्या बहिणीसोबत या विजयसोहळ्यात सहभागी झाली होती. तिच्या आजीने सांगितले की, मी माझी नात गमावली आहे. तिच्या काकूने सांगितले की, स्टेडियममध्ये सीपीआर किंवा कोणतीही वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी कोणीही नव्हते. आम्ही तिला एका गाडीत बसवून रुग्णालयात नेले. मुख्यमंत्री आले तेव्हा त्यांच्यासोबत खूप मोठी पोलीस सुरक्षा होती. पण स्टेडियममध्ये पोलिसांची उपस्थिती नव्हती. बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करणारी तामिळनाडूची 29 वर्षीय कामाक्षी देवी एकटीच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेली होती. तिचाही मृत्यू झाल्याचे दैविक या तिच्या सहकाऱ्याने सांगितले.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या