रियाध
सौदी अरेबियाच्या हलबन येथील वाळवंटात अडकलेल्या एका कुटुंबाची तब्बल आठ दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी हे कुटुंब वाळवंटातून जात असताना त्यांची गाडी वाळूत अडकली. तेव्हापासून त्यांचा जगाशी संपर्क तुटला होता.
सौदी अरेबियाच्या रियाधपासून २३९ किलोमीटर दूर असलेल्या वाळवंटात त्यांची गाडी, वाळूत अडकल्यानंतर त्यांचा जीवनासाठीचा संघर्ष सुरु झाला. अवतीभवती असलेली काही खुरटी झुडपं आणि झाडांची पाने खाऊन आणि गाडीच्या रेडिएटरमधले पाणी पिऊन त्यांनी दिवस काढले. हा संघर्ष तब्बल आठ दिवस सुरु होता. त्यांच्या बचावासाठी एनजाद या खाजगी बचाव दलाने काम सुरु केले. त्यांनी ४० बचाव पथके, ड्रोन व डिजिटल मॅपिंगसारख्या अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने या कुटुंबाचा शोध सुरु केला. तब्बल २४ तासानंतर एका ड्रोनद्वारे कुटुंबाचे संकेत मिळाले. त्यानंतर पिनपॉईंट तंत्राच्या सहाय्याने ते या कुटुंबापर्यंत पोहोचले. या कुटुंबातील सर्वच सदस्य थकलेले होते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाणही खालावले होते. त्यांची तिथून सुटका करुन त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबातील सर्व सदस्य सहिसलामत असल्याबद्दल सौदीच्या प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
