हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान

कोलंबो – श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी अनुरा दिसनायके यांच्या निवडीनंतर पंतप्रधानपदी नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीच्या नेत्या हरिणी अमरसूर्या यांची निवड झाली आहे. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २००० मध्ये सिरिमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान होत्या. त्यानंतर अमरसूर्या या श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अनुरा दिसनायके हे विजयी झाल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींनी अमरसूर्या यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.आज त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाच्या अन्य २ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. हरिणी अमरसूर्या यांच्याकडे शिक्षण, श्रम,उद्योग, विज्ञान , माहिती व तंत्रज्ञान यासारखी महत्वाची खाती असतील. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य असेल. तसेच दिसनायके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू, असे हरिणी यांनी सांगितले.