हल्ल्याच्या तयारीसाठी मोदींचे बैठकांचे सत्र! हल्ल्याच्या तयारीसाठी मोदींचे बैठकांचे सत्र

नवी दिल्ली- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याबाबतच्या हालचालींना आज आणखी वेग आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काल नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. लागोपाठ घेतल्या जाणाऱ्या बैठकांतून पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईची रुपरेषा तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. तर भारताच्या तयारीने बिथरलेल्या पाकिस्तान सरकारने भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या संसदेचे तातडीचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत बैठका घेत आहेत. मोदी यांनी लष्कराला कारवाईसाठी खुली मुभा दिली आहे. त्यानंतर वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. मोदी आणि एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्यात आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी 40 मिनिटे भेट झाली. यावेळी दोघांशिवाय तिसरे कुणीच उपस्थित नव्हते. काल मोदी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची दीड तास भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिन्ही हवाई दल प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालदेखील उपस्थित होते. या लागोपाठ होत असलेल्या बैठकींचा तपशील जाहीर केला जात नसला तरी पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईची रुपरेषा तयार करण्यासाठी त्या होत असल्याचे म्हटले जात आहे.
सिंधू करार रद्द करणाऱ्या भारताने आज जम्मूतील रामबन येथे बांधलेल्या बगलिहार धरणाच्या माध्यमातून चिनाबचे पाणी थांबवून पाकिस्तानला आणखी एक झटका दिला. काश्मीरमधील किशनगंगा धरणातून झेलम नदीचे पाणी रोखण्याचीही भारताची पुढील योजना आहे. त्याचा पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो.
भारत -पाक तणावादरम्यानच भारतीय सैन्याला रशियन बनावटीच्या इग्ला-एस क्षेपणास्त्रांची एक मोठी खेप मिळाली आहे. भारतीय लष्कराने रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. 1990 च्या दशकापासून वापरात असलेल्या इग्ला क्षेपणास्त्रांची इग्ला-एस ही प्रगत आवृत्ती आहे. खांद्यावर वाहून नेता येणार्या इग्ला-एसची रेंज 6 किलोमीटरपर्यंत आहे. ही क्षेपणास्त्र लढाऊ विमाने, ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांना काही मीटर अंतरावरूनच लक्ष्य करून पाडू शकतात. या प्रणालीमुळे भारतीय सीमेवर हवाई आक्रमणांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. या प्रणालीबरोबर भारताने 48 लाँचर्स आणि 90 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची निविदा भरली आहे. लवकरच ही खरेदी पूर्ण होईल.
सीमा सुरक्षा दलाने आज राजस्थान सीमेवर एका पाकिस्तानी जवानाला अटक करुन ताब्यात घेतले. तो भारतीय सीमेत घुसखोरी करत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. या जवानाची सध्या चौकशी सुरू आहे. तर अमृतसरमधून दोन भारतीय हेरांना अटक करण्यात आली आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांची नावे असून ते पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. भारतीय लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो त्यांनी पाकिस्तानला दिल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्यांना सीम कार्ड पुरवण्यात आली होती. त्यांच्याकडे काही संवेदनशील कागदपत्रेही सापडली आहेत.
भारताच्या तयारीने बिथरलेल्या पाकिस्तान सरकारने उद्या पाकिस्तानी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात हे अधिवेशन पार पडणार असून त्यासाठी सर्व पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या अधिवेशनात भारत-पाक तणावावर, सिंधु जल करार आणि लष्करी सज्जता यावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी नेत्यांनी आजही बेताल वक्तव्ये करणे चालू ठेवले. रशियामधील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अथवा सिंधू नदीचे पाणी अडवले, तर पाकिस्तान केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे तर अण्वस्त्र हल्ला करून भारताला प्रत्युत्तर देईल.
पाकव्याप्त काश्मिरात हमास
पाकिस्तानने सलग दहाव्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील मदरसे भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने रिकामे केले आहेत. मात्र, त्यात आता दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली असून तिथे विद्यार्थी, मौलवींना एके 47 चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा कर्नल आसीफ खान याच्या नेतृत्वात हा हे प्रशिक्षण सुरू आहे. पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासचीही एन्ट्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदने काश्मीरमधील कारवायांसाठी हमासशी हातमिळवणी केल्याची माहिती मिळत आहे.