मुंबई- येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही क्रांतीची वेळ आहे, आतापर्यंत त्याच त्याच लोकांना संधी दिलीत, यावेळी मला एकदा संधी द्या, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला भावनिक आवाहन केले.
‘वर्षानुवर्षे राज्यकर्ते महाराष्ट्राचे सोने लुटत आहेत. आपण मात्र आपट्याची पाने वाटण्यात मग्न आहोत. अनेक वर्षे महाराष्ट्राची लूट सुरू आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली. मात्र ज्यांना संधी दिली त्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणाच केली. खासकरून गेल्या पाच वर्षांत तुमच्या मतांचा अनादर केला गेला. तुम्ही नेहमी मतदान करताना आपली शस्त्रे म्यान करून ठेवता आणि मतदान केल्यानंतर बोलता. हे असे यावेळी होऊ देऊ नका, शमी वृक्षावरची ती शस्त्रे उतरवा आणि तुम्हाला दगा देणार्या राज्यकर्त्यांना धडा शिकवा. इतकी वर्षे प्रगतीच्या थापा मारूनही तुमच्या मनातला राग मतदानातून व्यक्त होताना मला कधी दिसला नाही. यावेळी मला संधी द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे माझे स्वप्न आहे’, असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा प्रत्यक्ष उल्लेख न करता राज ठाकरे म्हणाले की, आज संध्याकाळी एकमेकांची उणीदुणी काढली जातील. पण त्यात तुम्ही कुठेच नसाल. एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली जाईल. पण त्यातून तुमच्या हाती काहीही लागणार नाही. म्हणून सांगतो आताच विचार करा आणि क्रांती घडवून आणा. तुम्ही बेसावध राहता म्हणून राजकारणी लोक तुमचा वर्षानुवर्षे गैरफायदा घेत आले आहेत. वेड्यावाकड्या युती आणि आघाड्या केल्या जाताहेत आणि तुम्ही मात्र शांत बसून हे सर्व सहन करत आहात. नुसते रस्ते आणि पूल बांधणे म्हणजे विकास नव्हे हे कधीतरी समजून घ्या. विकासाच्या नावाखाली नुसती लूट सुरू आहे. पण तुम्ही सारे हे सर्व मुकाट्याने सहन करत आहात. या निवडणुकीत तुम्हाला आजवर फसवत आलेल्या राज्यकर्त्यांना धडा शिकवा.
उद्याच्या मनसेच्या मेळाव्यात या सार्या राजकीय परिस्थितीवर सविस्तरपणे बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
