लखनौ – उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर येथे एका शेतात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. ही शस्त्रे १८५७ साली भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या उठावादरम्यान वापरली गेली होती,असे संशोधकांचे म्हणणे आहे.निगोही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढाकिया परवेजपूर नावाच्या खेडेगावात बाबू राम यांच्या शेतात हा शस्त्रसाठा आढळला. बाबू राम शेतात नांगरणी करीत असता जमिनीखाली गाडला गेलेला हा शस्त्रसाठा उकरून वर आला.कुतुहलापोटी बाबू राम यांनी तिथे आणखी खोदकाम केले असता ही ऐतिसासिक शस्त्रे त्यांच्या हाती लागली.बाबू राम यांनी ती जुनाट शस्त्रे पाहून याची माहिती सरकारला देण्याचा निर्णय घेतला. थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी या शस्त्रसाठ्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शस्त्रसाठा ताब्यात घेऊन तो भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आला.
