नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) अग्रगण्य कंपनी इन्फोसिसला ३२ हजार ४०३ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) थकविल्याप्रकरणी कर विभागाने नोटीस बजावली आहे.२०१७ पासून इन्फोसीसने परदेशांतील आपल्या शाखांकडून जी सेवा घेतली त्यावरील जीएसटीची ही रक्कम कंपनीकडे थकीत आहे,असा जीएसटी विभागाचा दावा आहे.दुसरीकडे इन्फोसीसने मात्र ही साधी कारणे दाखवा नोटीस आहे,असे म्हटले आहे.परदेशांतील आपल्याच शाखांमधून सेवा घेतल्यास त्यावर जीएसटी लागू होत नाही,असा दावा इन्फोसीसने केला आहे.जीएसटी परिषदेच्या शिफारशीनुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात परदेशांतील शाखांमधून भारतातील कंपनीने घेतलेल्या सेवांवर जीएसटी लागू होणार नाही,असे स्पष्टपणे नमूद केले आहे,असा दावाही इन्फोसिसने केला आहे.इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दोनच दिवसांपूर्वी भारताला ग्लोबल लीडर म्हणण्यास आक्षेप घेतला होता. चीनचा जीडीपी भारताच्या सहा पट आहे. देशातील उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सरकारच्या सहभागात आणि प्रशासनात सुधारणेची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर इन्फोसिसला ही नोटीस आली आहे.
