Home / महाराष्ट्र / ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर उत्साहात साजरा

३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर उत्साहात साजरा

रायगड – किल्ले रायगडावर आज ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ८० हजारांहून अधिक शिवभक्त गडावर...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

रायगड – किल्ले रायगडावर आज ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ८० हजारांहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे तसेच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील या सोहळ्याला हेदेखील उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने करण्यात आले होते.
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरुवात काल गडपूजनाने झाली. रायगड खोऱ्यातील २१ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन गडपूजन केले. त्यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोंधळ तर जगदिश्वर मंदिरात कीर्तन सोहळा पार पडला. आज सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मूर्तीला पंचामृत व सप्तगंगा स्नान घालण्यात आले.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, किल्ले रायगडावर साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला राज्याभिषेक सोहळा हा एक क्रांतिकारी दिवस होता. रायगडच्या हितासाठी जे योग्य आहे, तेच येथे राहील, ही माझी जबाबदारी आणि शब्द आहे. पूर्वी जिथे हजार-दोन हजार लोक यायचे, तिथे आज लाखो शिवभक्त येतात. शिवभक्ताएवढा शिस्तबद्ध आणि कायदा हातात न घेणारा दुसरा कोणी नसेल.शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून शासनाने तो राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा. छत्रपतींच्या विचारांचे आत्मचिंतन करायचे असेल तर नव्या पिढीत तो रुजवणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये छत्रपतींच्या कार्याचा समावेश व्हावा.

Web Title:
संबंधित बातम्या