आयुष्मान भारत योजनेतून ६०० हून अधिक खासगी रुग्णालये बाहेर, ‘हे’ आहे कारण

Ayushman Bharat Scheme | केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना (Ayushman Bharat Scheme) असलेल्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) मधून देशभरातील 609 खासगी रुग्णालयांनी (private hospitals) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयांनी हा निर्णय देयकांतील विलंब, कमी परतावा दर आणि काही राज्यांत उपचारांवरील निर्बंध यांसारख्या कारणांमुळे घेतल्याचे समोर आले आहे.

गुजरात आघाडीवर, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

राज्यसभा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, योजनेतून बाहेर पडलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये गुजरात (233) आघाडीवर आहे. त्यानंतर केरळमध्ये 146, तर महाराष्ट्रात 83 रुग्णालयांचा सहभाग आहे.

खासगी रुग्णालयांचे आरोप : दर कमी, पैसेही वेळेवर नाहीत

खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे की, योजनेअंतर्गत ठरवलेले दर व्यवहार्य नसून आर्थिक तोटा होत आहे. तसेच, राज्य सरकारांकडून वेळेवर देयके न मिळाल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरियाणामध्ये फेब्रुवारी महिन्यात IMAच्या अंतर्गत अनेक खासगी रुग्णालयांनी 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकीमुळे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील खासगी रुग्णालय संघटनांनीही निलंबनाची मागणी केली.

फक्त सरकारी रुग्णालयांना लाभ, खासगी रुग्णालये नाराज

छत्तीसगड आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये काही उपचार पॅकेजेस केवळ सरकारी रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने खासगी रुग्णालयांना रेफरल मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना योजनेत सहभागी राहणे अवघड होत आहे.

एनएचएने निश्चित केल्या देयक मर्यादा

राज्यमंत्री जाधव यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) राज्यातील रुग्णालयांसाठी 15 दिवसांच्या आत आणि पोर्टेबिलिटी रुग्णालयांसाठी 30 दिवसांच्या आत क्लेमची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत.

योजनेचा उद्देश आणि वाढ

23 सप्टेंबर 2018 रोजी झारखंडमधील रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली. योजनेअंतर्गत गरीब व दुर्बळ कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा पुरवला जातो. सुरुवातीला 10.74 कोटी कुटुंबांचा समावेश होता, जो जानेवारी 2022 मध्ये वाढवून 12.34 कोटी कुटुंबांपर्यंत नेण्यात आला. 2024 मध्ये 37 लाख आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या व त्यांच्या कुटुंबीयांना समाविष्ट करण्यात आले, तसेच वर्षअखेरीस 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांचा देखील यामध्ये समावेश जाहीर करण्यात आला.

तसेच, ओडिशा आणि दिल्ली ही राज्ये PMJAY मध्ये सहभागी होणारी 34 वी आणि 35 वी राज्ये ठरली, ज्यामुळे योजनेत आणखी 70 लाख कुटुंबांची भर पडली.

सध्या या योजनेतून 36 कोटींहून अधिक लोकांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असून, कोट्यवधी रुग्णांना लाभ मिळाला आहे. मात्र खासगी रुग्णालयांचा सहभाग कमी होत असल्यामुळे योजनेच्या यशावर सावट निर्माण झाले आहे.