Ahamadabad B.J. Medical collage
अहमदाबाद – अहमदाबाद लंडन विमान अपघाताच्या Ahmedabad London plane crash पार्श्वभूमीवर बीजे मेडिकल कॉलेजने सध्या सुरु असलेल्या व येणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. अपघातग्रस्त विमान याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयाने डॉक्टरांच्या उन्हाळी सुट्याही रद्द केल्या असून त्यांना जखमींची शुश्रुषा करायला सांगितले आहे.
अहमदाबाद लंडन हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळले. त्यात वसतीगृहातील २४ डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यानंतर या महाविद्यालयात सध्या सुरु असलेल्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांना बसणार आहे. महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी भितीमुळे वसतीगृह सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कोसळले तेव्हा वसतीगृहात असलेले ४० विद्यार्थी अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाहीत. विद्यार्थी या मानसिक धक्क्यामधून सावरल्यानंतर परीक्षा घेतल्या जातील असे महाविद्यालयाच्या प्रशासनाने म्हटले आहे