अहमदाबाद -अहमदाबाद बोईंग ड्रीमलायनरच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियावर (Air India) मोठी कारवाई करत नागरी उड्डयन महासंचालकांनी (DGCA) आज एअर इंडियाला तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले. यात विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि कर्मचारी नियोजनाशी संबंधित पायल अरोरा यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांवर नियमांच्या विरोधात क्रू पेअरिंग, अनिवार्य अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन, उड्डाण वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे असे गंभीर आरोप आहेत. डीजीसीएने त्यांना क्रू शेड्युलिंग (crew scheduling) आणि रोस्टरिंगशी संबंधित जबाबदारीतून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. एअर इंडियाने अधिकृत निवेदनात डीजीसीएचा आदेश स्वीकारल्याचे आणि त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे म्हटले आहे.
१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातानंतरही एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे. विविध कारणांमुळे ९ दिवसांत ८४ उड्डाणे रद्द करण्यात आली कंपनीच्या विमान उड्डाणांचे बुकिंग तब्बल ३५ टक्क्यांनी घटले आहे. सुरक्षेच्या भीतीपोटी प्रवाशांनी एअर इंडियाकडे पाठ फिरवल्याने कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.