Buldhana 35 teachers were suspended
बुलढाणा- बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची घसरत आहे. मात्र या परिस्थितीला तेथील शिक्षकांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. पटसंख्या कमी असलेल्या २० शाळांमधील तब्बल ३५ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तर ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 35 teachers were suspended & 60 has noticed या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एव्हढ्या मोठ्या संख्येच्या शिक्षकांवर केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाला ‘अन्यायकारक, अनाकलनीय व अतार्किक’ असे म्हणत तातडीने निलंबनाची कार्यवाही मागे घेण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री, ग्राम विकास मंत्री, शालेय सचिव, शालेय शिक्षण आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिक्षक संघटनेने असेही म्हटले आहे की, शाळांची पटसंख्या कमी होणे हे अनेक सामाजिक, आर्थिक व धोरणात्मक कारणांचा परिणाम आहे. स्थलांतर, खासगी शाळांचा प्रसार, रोजगाराच्या संधी, लहान कुटुंबांची संस्कृती, आणि शासनाच्याच धोरणामुळे दर एक किमीवर शाळा सुरू करणे ही कारणे यामागे आहेत. अशा स्थितीत शिक्षकांना दोष देणे अकारण व अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तरी निलंबनाची कारवाई तातडीने रद्द न केल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल.