कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कृष्णा नदीचे पाणी काठावरील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले.यामुळे या मंदिरातील श्री दत्त महाराजांची उत्सव मूर्ती जवळच्या स्वामी मंदिरात स्थलांतरित करण्यात आली आहे.
काल या वर्षातील तिसरा ‘दक्षिणद्वार सोहळा’ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.पुराच्या पाण्यातून श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु पाणी पातळी वाढू लागताच देवस्थान समितीने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील मौल्यवान वस्तू, पूजेचे साहित्य आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित ठिकाणी हलवल्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, श्री दत्तमहाराजांची उत्सवमूर्ती पालखीतून वाजत-गाजत जवळच्या नारायण स्वामी मंदिरात स्थलांतरित करण्यात आली.आता पुढील काही दिवस मंदिरातील सर्व नित्यनियम, पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी नारायण स्वामी मंदिरातच पार पडणार आहेत, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.