Go Back Adani! Locals oppose cement plant
Go Back Adani Locals oppose – ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले आंबिवली येथील अदानी समूहाच्या प्रस्तावित अंबुजा सिमेंट (Ambuja cement) कारखान्यासाठी काल जनसुनावणी झाली. यावेळी आजूबाजूच्या 10 गावांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. ‘अदानी गो बॅक’चा (Go Back Adani) नारा देण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही जनसुनावणी म्हणजे निव्वळ फार्स असून, अदानीच्या सांगण्यानुसार याचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप सहभागी ग्रामस्थांनी केला. गणेशोत्सवात लोक व्यग्र असल्याचे बघून मोजक्या वर्तमानपत्रांमध्ये जनसुनावणीची जाहिरात देण्यात आली. स्थानिक नागरिकांना कोणताही अभ्यास, तयारी करता येऊ नये म्हणूनच ही घाई करण्यात आल्याचेही नागरिक म्हणाले.
महिनाभरात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. अदानींचा हा सिमेंट कारखाना म्हणजे हिरवळ उगवण्याची योजना असेल, तर अदानींच्या दारातच हा प्रकल्प उभारा, असा संताप व्यक्त करण्यात आला. जनसुनावणीला आंबिवली, मोहने, अटाळीसह आजूबाजूच्या गावांतील रहिवाशांनी सहभाग घेतला. रक्ताचे पाट वाहतील, पण सिमेंट कारखाना होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला.अदानी समूहाने विकत घेतलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या जवळपास 450 एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याआधीच या प्रकल्पाला मोठ्या जनविरोधाला सामोरे जावे लागत आहे. ‘चले जाव अंबुजा सिमेंट चले जाव, गो बॅक अदानी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अंबुजा सिमेंट मुर्दाबाद’ अशा घोषणाबाजीत सकाळी जनसुनावणीला सुरुवात झाली. आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या परिसरातील या जनसुनावणीच्या सुरुवातीलाच पोलीस आणि खासगी बाऊन्सर यांचा बंदोबस्त अदानी समूहातर्फे केला होता.
या नियोजित सिमेंट कारखान्यामुळे स्थानिक लोकांना आरोग्याचा कोणताही धोका नसल्याचा अहवाल सादर केला आहे. हाच धागा पकडत उबाठा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आशा रसाळ म्हणाल्या की, कंपनीचे सादरीकरण बघून येथे सिमेंट कारखाना होणार नसून केवळ हिरवी झाडे उगवणार आहेत असे वाटले. अदानी यांच्या घरीच असा हिरवा कारखाना उभा करा. कारखाना उभारेपर्यंत असेच गोडगोड बोलत राहतील. आम्हाला असा कारखाना नको. सरकार काहीही लादेल, जनता हे खपवून घेणार नाही. जनसुनावणीचा हा फार्स आहे. केवळ आठ दिवस आधी आम्हाला जनसुनावणीची माहिती मिळाली. येथे राहणाऱ्या 50 लाख लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. 1947 साली एनआरसी कंपनी स्थापन झाली तेव्हा येथे लोकवस्ती नव्हती. आज दाट लोकवस्ती आहे, ही बाब विचारात घ्यायला हवी. जोरजबरदस्ती केली तर जशास तसे उत्तर देऊ.
सिमेंट कारखान्यामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका होणार आहे. पण कंपनीकडून केवळ 20 पानांचा अहवाल सादर करून लाखोंच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप अटाळी येथील बाळकृष्ण पाटील यांनी केला. ही सिमेंट कंपनी नाही तर कॅन्सर निर्मिती कंपनी आहे, असेही ते म्हणाले. रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळ नाही, तर हे प्रदूषक मंडळ आहे. हा प्रकल्प अदानीचा आहे. अदानीसाठी सरकारने कायकाय केले हे तुम्हाला नीट माहीत आहे. शुद्धीकरण प्रकल्पामधून (एसटीपी) होणारे प्रदूषण हे कंपनीबाहेरच जाणार आहे. मग हे कसे म्हणतात कंपनीतच त्यावर प्रक्रिया होईल? कारखान्यात भट्टी वापरणार का, हेवी मेटल निघणार आहेत का, कोळशाचा वापर केला जाणार आहे की नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले. अनेक तांत्रिक मुद्यांवर त्यांनी अदानींच्या अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. स्क्रिप्टनुसार ही जनसुनावणी होत आहे. त्यामुळे या जनसुनावणीला काहीच अर्थ नाही, असा आरोप करत ते निघून गेले. तसेच ‘अदानी हटाव, आमचा परिसर बचाव’, असा नाराही दिला.
काँग्रेस शहराध्यक्षांनी जनसुनावणीतील प्रश्नोत्तरे लिखित स्वरुपात प्रसिद्ध करण्याची मागणी केली. प्रकल्प रद्द न केल्यास राहुल गांधींपर्यंत हा मुद्दा नेणार असल्याचा इशारा दिला. काही नागरिकांनी कारखान्यासाठी दररोज सहा लाख लीटर पाणी लागणार आहे, ते कुठून आणणार आहात. परिसरात आधीच मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जात असताना तुम्ही पाणीही बाहेरून आणणार का, असा सवाल केला. त्यावर नदीतील पाणी वापरणार नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. भूजल आणि जमिनीवरील पाणी वापरणार असल्याचे सांगितले. यावर नागरिकांनी तुम्ही आमच्या जमिनीतील पाणी वापरू शकत नाही, असे प्रत्युत्तर दिले.माजी नगरसेवक के. सी. कटारिया म्हणाले, अदानी समूहाने ढोबळ माहितीच्या आधारे प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल दिशाभूल करणारा असल्यामुळे मंडळाने स्वतःहून सर्व्हेक्षण करावे. त्यामध्ये स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घ्यावे. सिमेंट कंपनीऐवजी आयटी पार्क उभारा, स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, त्यातून देशाला हातभार लागेल. पुण्यात साखर कारखाना होणार होता, तो रद्द करून शरद पवारांनी तिथे आयटी पार्क सुरू केला, असेही कटारिया यांनी सांगितले.
एनआरसी कंपनीकडे तब्बल दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा मुद्दा माजी कामगारांनी वेळोवेळी मांडला. अदानी समूह ही थकबाकी देणार का, या प्रश्नावर कायद्याने यंत्रणांकडून जे दिशानिर्देश येतील, तसा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले. एनआरसी कंपनीमध्ये तब्बल साडेचार हजार लोकांना रोजगार होता. पण अदानींच्या कंपनीत दोन-चारशे लोकांनाच रोजगाराची संधी उत्पन्न होत असल्याची बाबही यावेळी स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी प्रदूषण होणार आहे म्हणून, तर ही जनसुनावणी घेतली आहे, असे म्हणत प्रदुषणाचा मुद्दा अधोरेखित केला.संकल्पना कऱ्हाडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ विश्वासार्ह आहे का, असा थेट सवाल केला. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? उल्हास, काळू नदी प्रदूषित होत आहे. मग तुम्ही कशाचे नियंत्रण करणार आहात? हा प्रकल्प पंचक्रोशीतील लाखो लोकांचा जीव घ्यायला निघालेला आहे, असे त्या म्हणाल्या. जगभरात मातीची घरे उभारण्याचा ट्रेंड असताना तुम्हाला ही अवदसा का सुचली, या प्रश्नावर लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. अदानींच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
एकच मुद्दा वारंवार विचारला जातोय असा आक्षेप अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावर लोक म्हणाले, हा प्रश्न लोकांच्या किती जिव्हाळ्याचा, जीवनमरणाचा आहे हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे सगळे प्रश्न ऐका.मोहने येथील ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख सुभाष पाटील यांनी जनसुनावणीमध्ये कंपनीच्या प्रतिनिधींना स्थानिक लोकांनी नाही, तर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच प्रश्न विचारायला हवेत, असा मुद्दा मांडला. एनआरसी कंपनीकडे माजी कामगारांची तब्बल दोन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे, जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत कारखान्याचा विषय पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आणखी एका नागरिकाने आमच्या पूर्वजांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून एनआरसी कंपनीला जमीन दिली होती, अदानी समूह विश्वासार्ह नाही, असे सांगत अदानी अंबुजा सिमेंट कारखान्याला विरोध केला. प्रदूषण मंडळाने उत्तर द्यायला पाहिजे, पण अदानीचे लोक उत्तर देत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
किसान सभेतर्फे एनआरसीच्या माजी कामगारांनी आजची जनसुनावणी हा जाणीवपूर्वक केलेला बनाव आहे, असा गंभीर आरोप केला. कोणतीही तयारी करता येऊ नये म्हणून गणेशोत्सवात सुनावणीची तारीख जाहीर केली. आमचा या प्रकल्पाला विरोध असून, सुनावणीसाठी आणखी एक महिना संधी द्यावी. सध्याच्या सुनावणीने आम्हाला अभ्यासासाठीची संधी नाकारली गेली आहे, असेही किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उल्हास, काळू या प्रमुख नद्या या परिसरातून वाहतात. कंपनीकडून वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करू असे सांगितले जात आहे. पण शेवटी त्याचा निचरा हा नदीतच होईल. त्यामुळे या नदीचे पाणी पिणाऱ्या लाखो लोकांचा जीव धोक्यात येईल. कंपनीच्या अहवालात प्रदूषण कमी होईल, असे म्हटले आहे. पण सिमेंट कारखान्यामुळे प्रदूषण होणारच नाही, असा उल्लेख नाही. त्यामुळे जलप्रदुषणासोबतच हवा प्रदुषणही होणार आहे, असा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे कमी लोकवस्तीच्या ठिकाणी असे कारखाने का उभारत नाही, असा मुद्दा अटाळी येथील मोहन पाटील यांनी मांडला. रिपब्लिकन सेनेच्या माया कांबळे यांनी अदानी, अंबानी, मोदी यांच्याकडे दुसरे प्रकल्प नाहीत का, असा सवाल करत विरोध व्यक्त केला.अदानी समूहाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अदानी समूहाने 2020 मध्ये आंबिवली येथील 450 एकर परिसरातील नॅशनल रेयॉन कंपनी (एनआरसी) हा कारखाना ताब्यात घेतला. तेव्हा येथे लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतर 2022 मध्ये अदानी समूहाने अंबुजा सिमेंट ही अग्रणी सिमेंट कंपनी विकत घेतली. याच अदानी अंबुजा सिमेंटने एनआरसीच्या जागेत सिमेंट कारखाना उभारण्याकरता स्थानिक पर्यावरणाचा अभ्यासाचा कार्यकारी अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या काळात हा पी अँड एम या नोएडाच्या कंपनीने अंबुजा सिमेंटसाठी हा अभ्यास केला. याच अहवालानंतर मंडळातर्फे आजच्या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.आंबिवली, मोहने, अटाळीसह आजूबाजूच्या जवळपास 10 गावांमधून सह्यांची मोहीम राबवत रहिवाशी, एनआरसी कंपनीचे माजी कामगार एकवटले आहेत. आजच्या जनसुनावणीतूनही स्थानिक आगरी-कोळी बांधव, नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त यांचा रोष समोर आला. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही पक्षीय पातळीवर नागरिकांना पाठिंबा देत अदानींच्या कंपनीला विरोध केला. भाजपा पदाधिकारी मात्र असा विरोध करताना दिसले नाहीत. ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी जयवंत हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जनसुनावणी झाली. अदानी समूहातर्फेही नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यात आली.
सकाळी पाऊणे बाराला सुरू झालेला जनसुनावणी दुपारी अडीच वाजेपर्यंत चालली.अदानी समूहाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पर्यावरणाबद्दलच्या सर्व कायद्यांचे पालन करूनच हा प्रकल्प पुढे जाईल. मुंबई महानगर परिसरातही सिमेंटचे दोन-तीन प्रकल्प आहेत. आंबिवली प्रकल्पात केवळ ग्राईंडिंग केले जाणार आहे. जवळपास 70 टक्के मालावर इतरत्र असलेल्या एकात्मिक सिमेंट कारखान्यात प्रक्रिया केली जाईल. इथे त्यावर ग्राईंडिंग आणि पॅकेजिंग होईल. त्यामुळे फार कमी प्रमाणात प्रदूषण होईल. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक नियमावलीपेक्षाही अधिक काळजी घेऊ. कोणत्याही प्रकारचा बॉयलर प्रस्तावित नाही. आमच्या या कारखान्यासाठी खूप कमी पाणी लागते. परवानगी मिळाली, तरच स्थानिक पाणी वापरले जाईल. स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देऊ.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आजच्या जनसुनावणीत कोणताही निर्णय होणार नाही. जनसुनावणीचा अहवाल तयार करून तो सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतरच निर्णय होईल.
हे देखील वाचा –
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला सीसीटीव्ही फुटेजच नाही! आरोपी अटकेत
माणसाचा ‘मेंदू खाणारा अमिबा’ काय आहे? आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू
तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद