नाशिक- नाशिकच्या अंबड परिसरात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (suicide) केली. प्रेमसंबंध ठेवण्याचा दबाव, शिवीगाळ, सोशल मीडियावर केलेली बदनामी आणि सततच्या छळाला कंटाळून पीडितेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मृत मुलगी अंबडमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या तिघांनी तिला प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला.
पीडितेवर प्रेमसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली जात होती. मात्र, तिने ठाम नकार दिल्यामुळे तिचे इन्स्टाग्राम आयडी व पासवर्ड घेऊन त्यावर तिचा एका मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो पोस्ट केला. या फोटोला ‘बॉयफ्रेंड आहे’ असे कॅप्शन दिले. या पोस्टमुळे महाविद्यालयात तिची प्रतिमा मलीन झाली व बदनामी झाली. याचदरम्यान पीडितेला वारंवार फोन करून शिवीगाळ केली जात होती आणि तिला धमकावले गेले. या मानसिक छळामुळे ती प्रचंड नैराश्यात होती. अखेर तिने आपल्या घरातील बेडरूममध्ये फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. यावेळी घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर अंबड पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.