वर्धा- विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची विभागीय मंथन बैठक आज सेवाग्रामच्या चरखा भवन येथे झाली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विदर्भातील मंत्री, खासदार, आमदार आणि ७०० पदाधिकारी उपस्थित होते. परंतु राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार या बैठकीला गैरहजर होते. त्यांनी श्रावणातील पहिला सोमवार असल्याने महाराष्ट्राबाहेर वैयक्तिक नियोजित पूजेचा कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहणार नसल्याचे पक्षाला कळवले. त्याप्रमाणे ते चंद्रपूरहून हैद्राबादला गेले .
ते मंथन बैठकीत गैरहजेर राहिल्याने भाजपातील अंतर्गत राजकीय धुसपूस पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. पावसाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांनी महायुती सरकारला अनेक मुद्द्यांवरून धारेवर धरत घरचा आहेर दिला होता. याशिवाय २०२४ मध्ये किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाला मुनगंटीवार यांनी सुरवातीला विरोध केला होता. त्यावरून त्यांच्यात आणि पक्षात तणाव निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठांच्या सुचनेनंतर मुनगंटीवारांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्यासही त्यांनी अनिच्छा दर्शवली होती. परंतु नंतर त्यांनी पक्षनिर्णय स्वीकारून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रीपदावरून डावलल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
