BIMSTEC Summit 2025 | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 2 दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर असून, BIMSTEC शिखर परिषदेत (BIMSTEC Summit 2025) सहभागी होण्यासाठी गुरुवारी बँकॉकला (Bangkok) पोहोचले. बँकॉक विमानतळावर त्यांचे औपचारिक गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले.
बँकॉकमध्ये आगमनानंतर पंतप्रधान मोदी यांनी थायलंडचे पंतप्रधान पैतोंगतार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीस भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. मोदी 4 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या BIMSTEC च्या सहाव्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
BIMSTEC म्हणजे काय?
BIMSTEC म्हणजे Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation. ही एक प्रादेशिक संघटना असून, बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या 7 देशांचा या संघटनेत सहभाग आहे –
ही संघटना 6 जून 1997 रोजी स्थापन झाली असून, मुख्यालय ढाका, बांगलादेश येथे आहे. भारत हे BIMSTEC चे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
BIMSTEC चा इतिहास व विस्तार
संघटनेची सुरुवात ‘BIST-EC’ (Bangladesh, India, Sri Lanka, Thailand Economic Cooperation) या नावाने 4 देशांनी केली होती. नंतर 22 डिसेंबर 1997 रोजी म्यानमार सामील झाला आणि संघटनेचे नाव ‘BIMST-EC’ झाले. पुढे फेब्रुवारी 2004 मध्ये नेपाळ व भूतान सामील झाल्याने BIMSTEC चे एकूण सदस्य देश 7 झाले.
BIMSTEC चे अध्यक्षपद कसे ठरते?
संघटनेचे अध्यक्षपद सदस्य देशांच्या इंग्रजी नावांच्या अक्षरानुसार बदलते. प्रत्येक शिखर परिषदेदरम्यान अध्यक्षपद हस्तांतरित केले जाते. सध्या थायलंड अध्यक्ष आहे, आणि पुढील अध्यक्ष बांगलादेश असणार आहे. भारताने हे अध्यक्षपद 2000 मध्ये आणि 2006 ते 2008 दरम्यान भूषवले होते.
BIMSTEC चा मुख्य उद्देश सदस्य देशांमधील आर्थिक सहकार्य, व्यापार, तांत्रिक विकास आणि राजनैतिक संबंध मजबूत करणे आहे.
4 एप्रिल 2025 रोजी बँकॉक येथे होणाऱ्या सहाव्या BIMSTEC शिखर परिषदेमध्ये “समृद्ध, लवचिक आणि खुले BIMSTEC” ही थीम असणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत व थायलंडमधील आर्थिक भागीदारी, नवतंत्रज्ञानातील सहकार्य, आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.