मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांच्या गाड्या एकमेकांना धडकल्या

Police Vehicles Collide with Each Other on Mumbai-Pune Expressway

Police Vehicles Collide with Each Other on Mumbai-Pune Expressway

मुंबई- बांगलादेशी घुसखोरांना पुण्याकडे नेत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांचा पनवेलजवळील भाताण बोगद्याजवळ अपघात झाला. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडलेल्या या अपघातात १५ पोलीस आणि १२ बांगलादेशी नागरिक जखमी झाले असून, एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत अटक केलेल्या नागरिकांना पुण्याला हलवले जात होते. या ताफ्यात पोलिसांच्या पाच ते सहा गाड्या, एक स्कॉर्पिओ, एक जीप, एक टेम्पो आणि महामंडळाची बस होती. सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास याच मार्गावर एक कंटेनर उलटल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर हटवताना हायड्रा मशीनला एका टेम्पोची धडक बसली आणि एक लेन पूर्णपणे बंद झाली. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीने समोर असलेल्या एसटी बसला धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या पोलिसांच्या इतर गाड्याही एकमेकांवर आदळल्या. एस्कॉर्ट करत असलेली स्कॉर्पिओसुद्धा या साखळी अपघातात धडकली. अपघातानंतर महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण झाला असून, काही तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने बचावकार्य राबवून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.