नवी दिल्ली -बंगळुरु येथे ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीची प्रथमदर्शनी जबाबदारी ही आरसीबी (RCB) संघावरच असून त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनातील गलथानपणामुळे ही चेंगराचेंगरी (stampede)झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. असा निर्वाळा केंद्रीय प्रशासकीय प्रधिकरण (Central Administrative Tribunal)अर्थात कॅटने दिला.
आपल्या निकालात कॅटने म्हटले आहे की, बंगळुरुमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याची जबाबदारी आरसीबी संघाचीच आहे. ५ लाखांची गर्दी जमा करण्याआधी आरसीबीने पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यांनी अल्पावधीतच या कार्यक्रमाची माहिती समाजमाध्यमावर टाकली व इतक्या मोठ्या संख्येने तिथे लोक आले. शेवटच्या क्षणी अशा प्रकारे विजयी सोहळ्याची घोषणा करणे मूर्खपणाचे आहे. १२ तासांच्या वेळेत पोलिसांनी सर्व व्यवस्था करणे अशी अपेक्षा ठेवण्यासाठी पोलीस काही जादूगार किंवा देव नाहीत. पोलीसही माणसे आहेत. इतकी मोठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे काही अल्लादिनचा जादूई दिवा नाही. गर्दीचे नियंत्रण चुटकीसरशी होत नसते. पोलिसांना व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, तो देण्यात आला नाही. याच दिवशी विधानभवनात दुसराही कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांवरही अतिरिक्त ताण आला. पोलिसांना योग्य माहिती देण्यात आली असती तर त्यांना व्यवस्थेसाठी वेळ मिळाला असता.
