नवी दिल्ली – भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडिया (INDIA) आघाडीच्या बैठकीचा (meetings) धसका घेतला आहे.त्यामुळेच आज घाईघाईने रालोआने बैठक बोलावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) काहीही कारण नसताना सत्कार केला,अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली.
भाजपा आणि रालोआला ऑपरेशन सिंदूर प्रमाणाबाहेर यशस्वी झाले असे वाटते.त्यामुळे त्यांनी हे ऑपरेशन करवणाऱ्या मोदींचा सत्कार केला. खरेतर मोदी आणि शहा यांनी अशा अशा गर्जना केल्या होत्या की आता पाकव्याप्त काश्मीर आपल्याला मिळालेच असे आम्हालाही वाटू लागले होते. तसे झाले असते तर आम्हीदेखील मोदींचा सत्कार केला असता असा तिरकस टोला राऊत यांनी लगावला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राऊत यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली. चीनने भारताचा भूभाग गिळंकृत केला हे वास्तव आहे. याआधी विरोधकांनी अनेकदा चीनबद्दल सवाल उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनीही तेच केले. त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही,असे राऊत म्हणाले.