दक्षिण कोरियात राजकीय भूकंप, मार्शल लॉ लावणाऱ्या राष्ट्रपतींच्या महाभियोगावर न्यायालयाची मोहोर; मागील 4 महिन्यांत काय घडले?

Yoon Suk Yeol impeachment | दक्षिण कोरियातील (South Korea) राष्ट्रपती युन सुक येओल (Yoon Suk Yeol) यांच्यावर लावण्यात आलेल्या महाभियोगाला घटनात्मक न्यायालयाने वैध ठरवले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रपती पदावरून त्यांची अधिकृत हकालपट्टी झाली असून, त्यांच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यता संपुष्टात आल्या आहेत.

राष्ट्रपती युन (Yoon Suk Yeol impeachment) यांच्यावर देशात मार्शल लॉ (Martial law Korea) लावण्याचा आणि नॅशनल असेंब्लीवर दबाव आणण्यासाठी लष्कर पाठवण्याचा आरोप होता. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी मार्शल लॉ लागू केल्याने देशात मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थिरतेला सुरुवात झाली होती. काही तासांनंतरच त्यांनी टीकेच्या झोडीमुळे मार्शल लॉ मागे घेतले.

घटनात्मक न्यायालयाचा ठपका

न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे नमूद केले की, युन यांनी केवळ मार्शल लॉ घोषित केले नाही, तर त्यांनी संविधानाचे उल्लंघन करणारी पावले उचलली. यामध्ये खासदारांच्या कामात अडथळा आणण्यासाठी लष्कर आणि पोलीस दलांची एकत्रितपणे तैनाती करणे, हे अत्यंत गंभीर पाऊल असल्याचे न्यायालयाने म्हटले.

महाभियोगाची कारवाई आणि देशातील अस्थिरता

14 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने युन यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, अंतिम निर्णयासाठी घटनात्मक न्यायालयाची मंजुरी आवश्यक होती. आता त्या निर्णयामुळे सरकारकडे 60 दिवसांत राष्ट्रपतीपदासाठी (Presidential elections Korea) निवडणूक घेण्याची जबाबदारी आली आहे. तोपर्यंत हान डक-सू कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून पदावर राहणार आहेत.

दक्षिण कोरियातील घटनांचा कालक्रम

  • 3 डिसेंबर 2024 – राष्ट्रपती युन यांनी मार्शल लॉ जाहीर केले. संसदेकडे लष्कर पाठवण्यात आले. प्रचंड जनआंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्शल लॉ मागे घेण्यात आला.
  • 4 डिसेंबर 2024 – विरोधी पक्षांनी महाभियोगाची मागणी करत अधिकृत प्रस्ताव दाखल केला.
  • 14 डिसेंबर 2024 – 300 पैकी 204 खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. युन यांना पदावरून निलंबित करण्यात आले.
  • 27 डिसेंबर 2024 – कार्यवाहक राष्ट्रपती हान यांच्यावरही महाभियोग चालवण्यात आला.
  • 30 डिसेंबर 2024 – युन यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी.
  • 3 जानेवारी 2025 – अटकेचा पहिला प्रयत्न अपयशी.
  • 14 जानेवारी 2025 – घटनात्मक न्यायालयात सुनावणी सुरू.
  • 15 जानेवारी 2025 – युन यांना अटक.
  • 18 जानेवारी 2025 – कोठडी वाढवली.
  • 8 मार्च 2025 – न्यायालयाने प्रक्रियात्मक कारणास्तव युन यांची सुटका केली.
  • 4 एप्रिल 2025 – न्यायालयाने महाभियोग वैध ठरवला.

दक्षिण कोरियामधील ही घटना आधुनिक इतिहासातील सर्वांत मोठ्या राजकीय उलथापालथींपैकी एक मानली जात आहे. आगामी निवडणुकीत देशातील स्थैर्य पुन्हा बहाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.