Teachers must taste the mid-day meal before serving it to students.
मुंबई- शाळेमधील माध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.या घटना लक्षात घेऊन शिक्षण विभागाने या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये शिक्षकांनी पहिल्यांदा माध्यान्ह भोजनाची चाखून मगच विद्यार्थ्यांना भोजन वाटप करावे, अशी महत्वाची सूचना करण्यात आली आहे.
राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी अनुदानित तसेच अंशत: अनुदानित शाळेमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. या मध्यान्ह भोजनातून होणाऱ्या अन्न विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सविस्तर मानक कार्यपद्धती जारी केली आहे.या योजनेत विद्यार्थ्यांना पौष्टिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळावा यासाठी धान्य साठवण, स्वयंपाक, आहार वितरण आणि स्वच्छतेबाबत काटेकोर नियमावली निश्चित करण्यात आली आहे. धान्य व इतर घटकांची गुणवत्ता तपासणी, स्वयंपाकघराची स्वच्छता,आधी शिक्षकांनी आहाराची चव चाखणे,नोंदी ठेवणे, पाण्याची शुद्धता सुनिश्चित करणे, आहार नमुना २४ तास जतन करणे यांसारख्या उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत.