Who is Nithyananda | स्वतःला ‘जगातील पहिले हिंदू राष्ट्र’ म्हणवणाऱ्या ‘कैलासा’च्या फरार नित्यानंदच्या (Nithyananda) प्रतिनिधींनी बोलिव्हियात नवा वाद निर्माण केला आहे. ‘कैलासा’शी (United States of Kailasa) संबंधित 20 लोकांना बोलिव्हियात अटक करण्यात आली आहे. हे लोक ॲमेझॉन परिसरातील जमिनीवर फसवणूक करून भाडेपट्ट्याचे करार करत होते.
संबंधित सर्व करार रद्द करण्यात आले आहेत. अटक केलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आले आहे. यात भारत, अमेरिका, स्वीडन आणि चीनचा समावेश आहे. हे सर्व लोक पर्यटक व्हिसावर बोलिव्हियात (Bolivian government) आले होते. बोलिव्हियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ नावाच्या कथित राष्ट्राशी त्यांचे कोणतेही संबंध नाहीत.
बाउरे या स्थानिक जमातीचे नेते पेड्रो गुआसिको यांनी सांगितले की, कैलासाचे लोक मदतीच्या नावाखाली संपर्कात आले होते. त्यांनी सुरुवातीला 25 वर्षांसाठी जमीन भाड्याने घेण्याचा प्रस्ताव दिला. दरवर्षी 2 लाख डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले गेले.
मात्र, नंतरच्या मसुद्यात 1 हजार वर्षांचा करार, हवाई क्षेत्राचा वापर आणि नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण यांचा समावेश होता. गुआसिको म्हणाले, “आम्ही विश्वास ठेवून सही केली, पण सगळं खोटं निघालं.”
कोण आहे नित्यानंद? (Who is Nithyananda?)
नित्यानंद उर्फ अरुणाचलम राजशेखरन याचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूत झाला. 2023 मधील रिपोर्टनुसार, तो सध्या अमेरिकेत आहे.
तो स्वतःला ‘सर्वोच्च धर्मगुरु’ म्हणवतो. ही पदवी हिंदू धर्मात अधिकृत नाही. 2019 पासून तो फरार आहे. त्याच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी यांसारखे गंभीर आरोप आहेत.
2019 मध्ये अहमदाबाद येथील आश्रमातून मुलांचे अपहरण करून देणग्या मागितल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच, भारत सरकारने त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला आहे. भारतीय दूतावासांना त्याच्या प्रतिनिधींना मदत न करण्याचे निर्देश दिले होते.