विरार डहाणू रेल्वेमार्गाच्याचौपदरीकरणाचे काम प्रलंबित

https://www.navakal.in/uncategorized/work-on-quadrangularization-of-virar-dahanu-railway-line-pending-marathi-news/

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर एमयुटोपीअंतर्गत विरार ते डहाणूदरम्यान चौपदरीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प मुंबई उपनगरी रेल्वेच्या सुधारित क्षमतेसाठी राबवला जात आहे. परंतु या प्रकल्पासंबंधी २०१८ आणि २०२५ साली मिळालेल्या माहितीच्या अधिकारातील उत्तरांमध्ये विसंगती असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकल्प ६ वर्षांत पूर्ण करायचा होता. मात्र, प्रत्यक्षात तो १० वर्षांतही पूर्ण होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

२०१८ साली या प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये ५ मार्च २०१८ रोजी एमआरव्हीसीने डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी हितेश सावे यांच्या माहिती अधिकारातील अर्जाला उत्तर देताना प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचा तपशीलवार आराखडा दिला होता. त्यानुसार जमीन संपादन डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तर डिसेंबर २०२१ पर्यंत मातीचे काम व पूल बांधकाम पूर्ण होणार होते. विरार ते डहाणू दरम्यान रेल्वेमार्ग व रेल्वे स्थानकाचे बांधकाम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार होते. याचा एकूण पूर्णता कालावधी ६ वर्षांचा होता. परंतु, आता सावेंच्या माहिती अधिकारातील अर्जाला उत्तर देताना या प्रकल्प योजनांविषयी अनेक नवीन बाबी उघड झाल्या आहेत. २३ जुलै २०२५ रोजी त्याच कार्यालयातून दिलेल्या उत्तरात हे मुद्दे उघड झाले आहेत.