अयोध्येतील ‘लोढा’चे जमीन संपादन वादात शेतकरी आणि कंपनी कर्मचाऱ्यांत हाणामारी

अयोध्या – अयोध्येतील जमीन संपादनाचा मुद्दा तापला असून यातून स्थानिक शेतकरी आणि ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनी’च्या कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यात लोढा यांच्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. लोढा यांची कंपनी बळजबरीने जमीन संपादन करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन झाल्यापासून जमिनीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहात आहेत. भाजपाचे मंगल प्रभात लोढा यांचे पुत्र अभिनंदन लोढा यांची कंपनीदेखील अयोध्येत २५ एकरावर विकास प्रकल्प उभारत आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम सुरू असून त्यावरून स्थानिक आणि लोढा यांच्या कंपनीत वाद आहे.
हाणामारीच्या घटनेनंतर अयोध्येतील कोतवाली पोलिसांनी आठ शेतकऱ्यांविरोधात तक्रार दखल करून त्यांची धरपकड केली आहे. दीपक माझी, रमेश माझी, राकेश माझी, विजय माझी, रवि माझी अशी त्यांची नावे आहेत. शेतकऱ्यांनी पोलिसांकडून अन्याय्य वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्ही पाकिस्तानी असल्यासारखी पोलिसांची वर्तणूक आहे. लोढाच्या कंपनीचे सुरक्षारक्षक आमच्या मुलांना मारहाण करत आहेत. आम्हाला संरक्षण देण्याऐवजी पोलीस आमच्यावरच गुन्हे दाखल करत आहेत. कंपनीचे लोक आम्ही कबूल केली आहे, त्यापेक्षा अधिक जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ते एका शेतकऱ्याच्या जमिनीवर खुणा करून खांब उभे करत असताना शेतकऱ्यांनी हल्ला केला. त्यांनी माझ्या डोक्यात काठीने वार केला. माझ्या सहकार्यांनी माझी सुटका केली. कंपनीच्या प्रवक्त्यानेही आपली बाजू मांडताना सांगितले की, कंपनीने कायदेशीर या जमिनीचे संपादन केले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी एक्सवरून प्रसिद्ध केला असून, शेतकऱ्यांना तुरुंगावस आणि उद्योगपतीना विलास अशी टीका केली आहे.