केजरीवाल जाणूनबुजून वजन कमी करीत आहेत! तिहार प्रशासनाची राज्यपालांकडे तक्रार

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपले वजन कमी व्हावे, तब्येत बिघडावी म्हणून जाणूनबुजून कमी कॅलरी असलेला आहार घेत आहेत,अशी तक्रार तिहार कारागृह प्रशासनाने दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे केली आहे.याची गांभीर्याने दखल घेत नायब राज्यपालांच्या सचिवांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या आहाराचे केजरीवाल काटेकोरपणे पालन करतील यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार कारागृहात आहेत. केजरीवाल यांना पहिल्यांदा अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)२१ मार्च रोजी अटक केली.त्यानंतर १ एप्रिल रोजी त्यांची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. ईडीने दाखल केलेल्या खटल्यात केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना अटक केल्यामुळे त्यांची तिहारमधून सुटका होऊ शकलेली नाही.

तिहार कारागृहाच्या अधीक्षकांनी नुकताच नायब राज्यपालांना केजरीवाल यांच्या आरोग्याबाबतचा अहवाल सादर केला.केजरीवाल हे जाणूनबुजून तब्यतीची हेळसांड करतात. डॉक्टरांनी ठरवून दिलेला आहार घेण्यास ते अनेकदा नकार देतात. ७ जुलै रोजी रात्रीच्या जेवणापूर्वी इन्शुलीनचा डोस घेण्यासही केजरावाल यांनी नकार दिला. त्यांच्या अशा वागण्यामुळे प्रकृतीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे,असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.