पुणे – गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थेच्या कुलगुरूपदावरून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजीव संन्याल यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोखले संस्थेची मातृसंस्था असलेल्या हिंदसेवक संघाचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी या बदलाबाबत पत्र विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि संस्थेचे अंतरिम कुलगुरू डॉ. शंकर दास यांना पाठवले. मात्र, डॉ. दास यांनी साहू यांना प्रत्युत्तरादाखल पत्र लिहून, यूजीसीच्या नियमानुसार कुलगुरूंना तडकाफडकी हटविता येत नाही, असे स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉ. बिबेक देबरॉय यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. संजीव सन्याल यांची या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र, आता त्यांना पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळातील विविध बाबींवर आक्षेप घेण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष साहू यांनी डॉ. सन्याल यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, संस्थेचे प्रभारी कुलगुरू डॉ. शंकर दास यांच्या कार्यकाळात संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला आणि भरतीला फटका बसला. त्याचप्रमाणे, प्रा. दास यांनी भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवलेली नाही. गोखले संस्थेसाठी ठोस कृती आराखडा दिला नसल्याने संस्थेची पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून देण्यास सक्षम अशा कुलपतींची निवड करण्यात येत आहे.
