टोक्यो- जपानने होलोग्राम असलेल्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. वीस वर्षांनंतर या नोटा बाजारात आणल्या असून अशी वैशिष्ट्यपूर्ण छपाई जगात पहिल्यांदाच केली गेली आहे. या नोटावर थ्रीडी छायाचित्र छापण्यात येणार असून ज्या दिशेला नोट धरली जाईल त्यानुसार हे छायाचित्र बदलेल अशी याची रचना आहे.
या नोटांवर छापण्यात आलेल्या छायाचित्रांमधून जपानची आर्थिक प्रगती, महिला सक्षमीकरण त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील संशोधन दिसून येईल अशी माहिती जपानचे पंतप्रधान फुमियो शिबो यांनी दिली आहे. ते म्हणाले की जपानची अर्थव्यवस्था सध्या अधिक मजबूत होत असून ३३ वर्षांनंतर जपानमधील कामगारांच्या वेतनात वाढ होत आहे. आर्थिक मंदी व येनचे घसरलेले मूल्य हा चिंतेचा विषय असला तरी जपानच्या आर्थिक प्रगतीचा वेग सध्याच्या काळात अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जपानने १०, ५ आणि १ हजार येनच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. यातील १० हजार येनच्या नोटेवर जपानमध्ये पहिली बँक आणि शेअर बाजाराची निर्मिती करणारे इची शिबुरावा यांचे छायाचित्र असून ५ हजार येनच्या नोटेवर पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापन करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ उमेको सुदा यांचे छायाचित्र आहे. १ हजार येनच्या नोटेवर महत्त्वाचे वैद्यकीय संशोधक शिबासाबुरो किट्साते यांचे छायाचित्र छापण्यात येणार आहे..