जयपूर- जयपूर शहरात एका फॅक्ट्री मालकाच्या भरधाव कारने नऊ जणांना चिरडले . या अपघातात अवधेश पारीक (३५) आणि ममता कंवर (५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना काल रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी कार चालक उस्मान खान (५५) याला अटक केली आहे. खान शास्त्री नगरमधील राणा कॉलनीचा रहिवासी असून लोखंडी पलंग तयार करण्याचा व्यवसाय करतो.
काल रात्री त्याने नाहरगड पोलीस ठाण्याजवळील चौकात सर्वप्रथम एका स्कूटर आणि पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर संतोषी माता मंदिराजवळ आणखी एका बाईक आणि पादचाऱ्यावर गाडी घातली. यानंतर एमआय रोड आणि शहरातील अरुंद रस्त्यांवरून जात असताना खानने अनेक दुचाकींना आणि नागरिकांना धडक दिली. संतोषी माता मंदिर परिसरात त्याने सर्वाधिक नुकसान केले. लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो गाडी घेऊन पळून गेला. त्यानंतर संजय सर्कलजवळ एका अरुंद रस्त्यावर गाडी अडकल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी खानला अटक केली. या अपघातात वीरेंद्र सिंह (४५), मोनेश (२८), दीपिका सोनी (१७), मोहम्मद जलालुद्दीन (४४), विजय नारायण (६५), जेबुनिशा (५०) आणि अंशिका (२४) हे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वीरेंद्र यांच्यासह दोघांची प्रकृती गंभीर आहे.