दिशा सालियनची हत्याच! वडिलांची याचिका! आदित्य ठाकरे, सुरज पांचोलीवर गंभीर आरोप


मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एकेकाळी मॅनेजर असलेली दिशा सालियन हिच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. तिचे वडील सतिश सालियन यांनी दिशाच्या मृत्यू नंतर पाच वर्षांनी अचानक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इतक्या वर्षांनी ही याचिका करण्यामागे कोणता हेतू आहे का? हा प्रश्न आहे.
त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्या मृत्यूची पुन्हा नव्याने चौकशी करावी. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सुरज पांचोली व दिनो मोर्या आणि मुंबई पोलीस यांच्यावर याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोपही तिच्या वडिलाने याचिकेत केला आहे.
याआधी सतिश सालियन यांनी माझ्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र आता 5 वर्षांनंतर त्यांनी माझ्या मुलीची हत्या झाल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टात 150 पानांची याचिका दाखल करून एकच खळबळ माजवली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी पुन्हा नव्याने करावी. आदित्य ठाकरे, दिनो मोर्या, सूरज पांचोली, एकता कपूर, सध्या अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुशांत राजपूतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती आणि सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे यांच्या 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड तपासा. पेडणेकरांनी माझ्या कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला. पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्या आणि आम्हाला नजरकैदेत ठेवून तपासावेळी पुरावे खरे मानण्यास भाग पाडले. दिशा सालियनच्या शवविच्छेदनाचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावा, दिशाच्या इमारतीचे 3 ते 10 जूनचे सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावे आणि आमच्या मुलाखती घेण्यापासून मीडियाला रोखावे. या प्रकरणाची आतापर्यंत झालेली चौकशी बनावट होती. पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबले. हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचे नाटक होते. खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या. मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या
देखरेखीखाली करावा.
ही याचिका दाखल केल्यानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सांगितले की, मी पहिल्या दिवसांपासून हेच सांगत आहे. दिशा सालियनची हत्या झाली होती. आदित्य ठाकरेंचे 8 जूनचे मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचे काय झाले हे मी विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? थेट तिच्या वडिलांनीच गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी झालीच पाहिजे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,सालियन कुटुंबांला मी एकदाच भेटले होते. तीन वर्षांपूर्वी त्यावेळी मी महापौर होते. त्यांनी बोलावले होते म्हणून मी घरी गेले होते. त्यावेळी माझ्याबरोबर मीडियाचे प्रतिनिधी होते.शिवसेनेचे पदाधिकारी होते.त्यामुळे त्यांच्याशी माझी जास्त ओळख नाही. पाच वर्षांनंतर दिशा सालियन कुटुंबांना आताच का जाग आली?