पालिकेचे २ हजार शिक्षक निवडणूक कामावर तैनात

मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी मुंबई महापालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या शाळेतील प्रत्यक्ष गैरहजेरीमुळे शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम होणार आहे.

पालिकेच्या ११९५ शाळांमध्ये ११ हजार शिक्षक सेवेत आहेत. या पालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाखांच्या घरात आहे. याच पालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले आहे. राज्यातील यंदाच्या निवडणुकीसाठी प्रथमच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.त्यामुळे पालिकेची वरीष्ठ प्रशासकीय यंत्रणा गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या कामात गुंतली आहे.त्यातच आता पालिकेच्या २ हजार शिक्षकांनाही याच कामासाठी तैनात करण्यात आले आहे. हे शिक्षक निवडणूकीच्या कामासाठी रुजूही झाले असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र याचा शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.