फिलीपाईन्सच्या ज्वालामुखीचा उद्रेक ८६ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

मनाली – फिलीपाईन्समध्ये काल झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळच्या परिसरात राहणाऱ्या ८६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्लालामुखीतून निघणाऱ्या राखेचे लोट अनेक किलोमीटर दूरपर्यत पसरले आहेत.

फिलीपाईन्सच्या कानलॉन ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. त्यानंतर राखेचे लोट उठू लागले त्याचबरोबर उष्ण लाव्हा पश्चिमेकडील डोंगर उतारावरुन खाली उतरू लागला. या ज्वालामुखीचे उद्रेक सतत होत राहणार असल्याचे फिलीपाईन्सच्या ज्वालामुखी विभागाने म्हटले आहे. या ज्वालामुखीच्या राखेमुळे परिसरात आरोग्याला हानीकारक वायू पसरला. हवेतील राखेमुळे फिलीपाईन्सहून सिंगापूर येथे जाणारे विमान रद्द करण्यात आले. इतरही काही आंतरदेशीय उड्डाणे रद्द करण्यात आली. कानलॉन च्या पश्चिम व दक्षिणेला असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कैस्टेलाना शहरातील लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वैज्ञानिक हवेतील विषारी वायुंचे परिक्षण करत आहेत. फिलीपाईन्सच्या या भागातील शाळाही बंद करण्यात आल्या असून अनेक भागात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.