बीड- मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती. यासाठी मला माझ्या पगाराच्या शंभर पट रक्कम देण्यात येणार होती. परंतु पाप नको म्हणून मी ही ऑफर नाकारली, असा खळबळजनक दावा बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत.
बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या रणजीत कासलेला काही दिवसांपूर्वी एक कोटीच्या खंडणी प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. नव्या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की, बोगस एन्काऊंटर करण्यापूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव यांची एक गुप्त बैठक होते. या बैठकीत पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर 5 ते 6 विश्वासू अधिकाऱ्यांची टीम तयार केली जाते. या टीममध्ये एक अधिकारी, दोन अंमलदार आणि एक हवालदार यांचा समावेश असतो. या सर्वांना एकरकमी 5 ते 10 कोटी रुपयांची ऑफर दिली जाते. अधिकाऱ्यांना सांगितले जाते की, चौकशी झाली तरी काही होणार नाही. आमचे सरकार आहे, आम्ही तुम्हाला चौकशीतून सोडवू. त्यामुळे असे बोगस एन्काऊंटर केली जातात. मी बीडमध्ये असताना माझ्याकडे चार जणांची टीम आली होती. त्यात दोन आयपीएस, एक आयएएस आणि मंत्रालयातील एक अधिकारी होता. त्यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली. तेव्हा मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होते, हा माणूस करू शकतो. याच्यामध्ये दम आहे. अशा एन्काऊंटरसाठी 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची वनटाईम ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या त्या विभागाला बोलावून घेतले जाते. सुरुवातीला मला माझ्या पगाराच्या 100 पट रकमेची ऑफर देण्यात आली होती. परंतु मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही. एवढे अधिकारी सोडून मलाच का निवडले, असे मी त्यांना विचारले. या संदर्भात मी एसपी आणि ॲडिशनल एसपी पांडकर यांच्याची बोललो होतो. त्यावर ते म्हणाले की, तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो घ्या. पण तुमचे आयुष्य चांगले होईल, असे निर्णय घ्या. सरकारी अधिकारी आणि मंत्रालयातील एक अधिकारी माझ्याकडे ही ऑफर घेऊन आले होते. त्यांची नावे मी स्टेशन डायरीमध्ये लिहिली आहेत. तुम्ही ऑनलाइन ती बघू शकता. दोन वर्षांत माझी सात वेळा बदली झाली आहे. मला ज्युनियर तुकाराम मुंडे बनवण्याचा प्रयत्न झाला. यासाठी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा दबाव होता.
व्हिडिओत बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरचाही रणजीत कासलेने उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर बनावट होता. त्यामुळे ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. जर एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल.
रणजीत कासलेच्या या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, निलंबित अधिकाऱ्याबद्दल मी बोलणार नाही. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, कासले हा विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती वाटत आहे. त्याने याआधीही मद्यधुंद अवस्थेत अनेक आरोप केले आहेत. आता त्याने एन्काऊंटरबद्दलचा खुलासा केला आहे. इतक्या दिवसांनी तो हे सांगतो आहे. त्यामुळे याच्या बोलण्याकडे फारसे कुणी लक्ष देऊ नये. रणजित कासलेला निलंबित झाल्यानंतरच अशी बुद्धी का सुचली? त्याने केलेले आरोप विक्षिप्त वाटत आहेत. काहीतरी खळबळ उडवून देण्यासाठी तो असे काहीतरी बोलत आहे. पण वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत, त्याने त्या सांगितल्या तर धनंजय मुंडेंना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या एन्काउंटरचा कट आखला जाऊ शकतो. परंतु आज जे कासले बोलतो आहे, त्याला काही अर्थ नाही.
