महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडणे-नाना पटोलेंची टीका

मुंबई- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व त्यांच्या हातातील संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा काँग्रेसने सुरुवातीलाच निषेध केला होता. तसेच शासनाला या घटनेची तातडीने दखल घेण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही तिघांच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. हे सरकार मलाईदार खात्यांसाठी आपसातच भांडण करण्यात व्यग्र आहे. मलाईदार खाते कुणाला मिळणार, यावर त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्या निर्देशानुसारच पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर लाठीमार केला. त्यामुळे या प्रकरणी परभणीच्या पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवावरही भाष्य केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षांपासून सर्वच जण सहभागी झाले होते. तिकीटवाटप, प्रचार या सर्वच कामांत त्यांचा सहभाग होता. त्यामुळे पराभवाची जबाबदारी सर्वांचीच आहे. या प्रकरणी श्रेयवादाचा विषय नाही. हा एकप्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने ईव्हीएमविरोधात सुरू केलेल्या लढाईवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कारण ही जनभावना आहे. काल आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना संविधान व लोकशाही वाचवायची असेल तर या देशात मतपत्रिकेवरच मतदान घेण्याची मागणी केली आहे.